(Image Credit : scandinavianlibrary.org)
लायब्ररी किंवा ग्रंथालय असा उल्लेख होताच कुणाच्याही डोळ्यांसमोर कपाटांमध्ये लागलेली पुस्तके येतात. तसेच वेगवेगळी पुस्तके वाचणारी लोकं येतात. पण ज्या लायब्ररीमध्ये पुस्तकंच नसतील ती कसली लायब्ररी? पण सध्या जयपूरसहीत राजस्थानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा पुस्तके नसलेल्या अनेक लायब्ररी वाढत आहेत. ज्या परिसात जास्त विद्यार्थी आहेत तिथे हे प्रमाण अधिक आहे.
नव्या पिढीच्या लायब्ररीची व्याख्या बदलू लागली आहे. ग्रंथालयाचं स्वरुप आता पारंपारिक राहिलेलं नाही. पुस्तकांनी भरलेली कपाटे, ती वाचण्यासाठी व्यवस्था हे आता मागे पडलंय. आता 'सेल्फ स्टडी झोन' स्वरुपात लायब्ररी सुरु होत आहेत. इथे विद्यार्थी त्यांची पुस्तके घेऊन येतात आणि अभ्यास करतात. सध्या अशाप्रकारच्या लायब्ररीचं चलन वाढलं आहे.
जयपूरमध्ये अशीच एक लायब्ररी चालवणारे तारा अनावा सांगतात की, 'आम्ही विद्यार्थ्यांना शांत जागा आणि वातावरण उपलब्ध करुन देतो. त्यामुळे इथे ते आत्ममग्न होऊन अभ्यास करु शकतात. तसेच त्यांना फ्री वाय-फायसारखी सेवाही पुरवतो. यामाध्यमातून ते लॅपटॉप किंवा टॅबवर ऑनलाइन क्लासेसही करु शकतात.
वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांसाठी तयारी करण्यासाठी घरापासून दूर शहरात रुम घेऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा लायब्ररी फायदेशीर ठरत आहेत. एका विद्यार्थ्यांने सांगितले की, केवळ रुम घेऊन राहणारे किंवा हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थीच नाही तर आपल्या परिवारासोबत राहणारे विद्यार्थीही या लायब्ररीमध्ये येऊन अभ्यास करतात. कारण त्यांना इथे त्यांना जास्त शांतता मिळते.
जयपूरमधील एका लायब्ररीचे मालक सुरजीत सांगतात की, हा एक चांगला उद्योगही आहे. ते म्हणाले की, 'बसण्यासाठी फर्निचर, पिण्याचं पाणी, एसी-हिटर आणि न्यूज पेपर या सेवांसाठी विद्यार्थ्यांकडून ४०० ते ६०० रुपये शुल्क घेतलं जातं. हे दोघांसाठीही फायदेशीर ठरतं. अनेक विद्यार्थी सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत आणि दोन वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत अभ्यास करतात. पुस्तके, लॅपटॉप आणि टॅब त्यांना स्वत: आणावे लागतात.