कुत्रा किती हुशार आणि प्रामाणिक प्राणी असतो हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. कुत्र्यांचा हुशारपणा सिद्ध करणारी एक आश्चर्यकारक घटना समोर आलं आहे. थायलॅंडमध्ये काही दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली जी वाचून तुम्हाला धक्काही बसेल आणि आनंदही होईल. एका तीन पायांच्या कुत्र्याने एका नवजात बाळाचा जीवनदान देण्याचं काम केलंय. या बाळाची १५ वर्षीय आई त्याला जिवंत जमिनीत गाडून गेली होती. ही घटना थायलॅंडच्या कोरट परिसरातील आहे आणि ज्या कुत्र्याने हे आश्चर्यकारक काम केलंय त्याचं नाव पिंग-पोंग आहे.
द वर्ल्ड न्यूज ऑनलाइनच्या रिपोर्टनुसार, पिंग-पोंगने एका अपघातात त्याचा एक पाय गमावला होता. एक दिवस तो अचानक मैदानात जोरजोरात भुंकू लागला आणि जमीन उकरू लागला. इतक्यात पिंग-पोंगचा भूंकण्याचा आवाज ऐकून त्याचे मालक बाहेर आलेत. जिथे पिंग-पोंग जमीन उकरत होता तिथे त्याच्या मालकांना एक नवजात बाळाचा पाय दिसला. नंतर त्यांनी माती बाजूला करून बाळाला बाहेर काढले.
कुत्र्यामुळे बाळ सुखरूप
बाळाला जमिनीतून काढून वेळीच रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता बाळाची स्थिती स्थिर असून त्याचं वजन २.३ किलो आहे. या बाळाचा जीव वाचवल्यावर पिंग-पोंग गावात हिरो ठरला आहे. काही वर्षांपूर्वी एका अपघातात पिंग-पोंगने पाय गमावला होता. तरी सुद्धा तो गावातील सर्वात अॅक्टिव्ह कुत्रा आहे.
बाळाच्या आईला अटक
दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार, नवजात बाळाच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. तिचं वय केवळ १५ वर्ष असून समाजाच्या भीतीने तिने बाळाला जिवंत दफन केले होते. आता तिच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.