कोणताही व्यक्ती हा जन्माने भिकारी नसतो, पण परिस्थिती त्याला भिकारी करते. असंच काहीसं या गावातील लोकांच्या नशीबी आलं आहे. उत्तर प्रदेशच्या मेनपुरी जिल्ह्यात एक असं गाव आहे ज्या गावात केवळ भिकारी राहतात. धक्कादायक बाब म्हणजे या गावातील आई-वडिलांच्या मनात त्यांच्या मुला-मुलींना डॉक्टर-इंजिनिअर करण्याचा विचार नसतो. कारण त्यांनी आधीच ठरवलेलं असतं की, मुलं-मुली भीक मागणार.
बेवर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दरबारी नावाच्या गावात केवळ ३० परिवार राहतात. हे लोक आजही मातीच्या घरात राहतात. त्यांच्या या मातीच्या घरांना ना दरवाजे आहेत, ना या गावासाठी कोणता रस्ता आहे. वीज आणि पाण्याविना या लोकांवर फारच हलाखीचं जीवन जगण्याची वेळ आली आहे.
१९५८ मध्ये जोहरीनाथचे वडील ख्यालीनाथ परिवारासोबत या गावात आले होते. जोहरीनाथ सांगतो की, पोट भरण्यासाठी कोणतही काम किंवा धंदा नसल्याने आम्ही सापांचा खेळ करून पोट भरत आलोय. पण केवळ यावरही पोट भरलं जात नसल्याने आम्ही भीक मागायला सुरूवात केली. त्यामुळे आता भीक मागणे हाच आमचा धंदा झाला आहे.
गावात साप पकडणे शिकवणारी शाळा
सरकारच्या वेगवेगळ्या योजना या गावात पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे या गावातील लोकांनी त्यांची वेगळी शाळा सुरू केली आहे. या शाळेत लोक लहान मुलांना सापांवर नियंत्रण कसं मिळवायंच हे शिकवत आहेत. या गावात २०० पेक्षा जास्त लोक राहतात आणि साधारण १०० रूपये दिवसाला कमवतात. नगला दरबारी या गावात राहणारे लोक अनेक पिढ्यांपासून भीक मागत आले आहेत. तसेच या लोकांना साप दाखवून भीक मागण्याच्या प्रकरणात अनेकदा तुरूंगातही जावं लागलं आहे.