पृथ्वीवरून मानव कधी आणि कसा नामशेष होणार? शास्त्रज्ञांनी दिली मोठी माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 03:12 PM2023-09-27T15:12:45+5:302023-09-27T15:12:57+5:30
शास्त्रज्ञांनी मानवाच्या नामशेष होण्याची भविष्यवाणी केली आहे.
आतापर्यंत पृथ्वीवरुन हजारो-लाखो प्राणी नामशेष झाले आहेत. दरम्यान, आता मानवाच्या नामशेषाचा मुद्दाही शास्त्रज्ञांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शास्त्रज्ञांनी मानव नष्ट होण्याची शक्यता वर्तवली आहे. आपल्या भविष्यवाणीत त्यांनी याचे कारण आणि वर्षाची माहितीदेखील दिली आहे. इंग्लंडच्या ब्रिस्टर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की, पुढील 250 मिलियन वर्षांत मानव आणि इतर सर्व सस्तन प्राणी नामशेष होतील. हवामान बदलाचा परिणाम समजून घेऊन वैज्ञानिकांनी त्यावर आधारित एक मॉडेल तयार केले आहे, ज्याच्या मदतीने मानव आणि इतर सस्तन प्राणी पृथ्वीवर किती काळ टिकतील, हे सांगण्यात आले आहे.
नामशेष होण्याचे कारण
संशोधक अलेक्झांडर फर्न्सवर्थ यांच्या मते, पृथ्वीवरील मानव आणि इतर सस्तन प्राण्यांना 40 ते 70 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागेल. जर आपण भविष्याकडे पाहिले तर ते अंधकारमय असेल, कारण कार्बन डायऑक्साइडची पातळी सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट होऊ शकते. मानव आणि इतर प्रजाती उष्णतेशी लढण्यास आणि शरीराला थंड ठेवण्यास असमर्थ होतील.
परिस्थिती का आणि कशी बिघडणार?
संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, पृथ्वी एक महाखंड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढील 250 वर्षांत केवळ 8 ते 16 टक्के क्षेत्रच राहण्यासयोग्य असेल. ते Pangea Ultima म्हणून ओळखले जाईल. येथील तापमान झपाट्याने वाढेल. आर्द्रतेचा परिणाम दिसून येईल. जगभरातील तापमान किमान 15 अंशांनी वाढेल. भविष्यात पृथ्वी राहण्यास योग्य असणार नाही.
अहवालात म्हटले आहे की, केवळ त्याच प्रजाती टिकून राहतील, ज्या तापमानाच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवण्यास सक्षम असतील. हवामान बदलावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, सरकारांनी हवामान बदलाच्या सर्वात वाईट परिस्थितीशी संबंधित परिणामांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तापमान अपेक्षेपेक्षा जास्त वाढले, तर पृथ्वीवरील सर्व मानवी जीवन संपण्याची शक्यताही वाढेल.