आपल्या आयुष्यात रंगांना खूप महत्त्व आहे. म्हणून आपल्याकडे अनेक चिन्हांकिंत भाषांमध्ये देखील रंग वापरले जातात. उदा. सिग्नल. लाल सिग्नल हा वाहन थांबवण्याची किंवा धोक्याची खूण म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे विविध वाहनांनाही विशिष्ट रंग दिले जातात जेणेकरून त्यांचा प्रवास सोपा होऊ शकेल.
बऱ्याचदा जहाजांना किंवा बोटीच्या तळांना लाल रंग दिलेला असतो. बोटीचा हा भाग बहुधा पाण्याखाली असतो. त्यामुळे अनेकांना हा समज होऊ शकतो की पाण्यात जहाज फिरत असलेले कळावे म्हणून हा रंग दिला जातो. पण, हा रंग देण्यामागे एक वेगळं आणि शास्त्रीय कारण आहे. याबाबत कोरा या प्रश्नोत्तराच्या संकेतस्थळावर उत्तर देण्यात आलं आहे.
या लाल रंगाचं मूळ जहाजांच्या इतिहासात दडलं आहे. सुरुवातीच्या काळात बहुतेक जहाजे लाकडापासून बनलेली असायची. लाकूड एक सेंद्रिय पदार्थ असल्याने जहाजाची मंद गती आणि लाकडाची सच्छिद्रता हे पाण्याखालील समुद्री जीवन-समुद्री शेवाळ, एकपेशीय वनस्पती तसेच किड्यांसाठी एक आदर्श प्रजनन क्षेत्र बनायचे.
समुद्री जीवांच्या वाढीमुळे जहाजाचे वजन वाढायचे, इंजिनावर भार पडून परिणामी जहाजांच्या वेगावरही मोठा परिणाम व्हायचा. जहाजबांधणी तज्ज्ञांना तातडीने असे काहीतरी हवे होते जेणेकरून समुद्राच्या तळाशी असलेल्या समुद्री जीवनाच्या प्रचंड वाढीचा सामना केला जाईल. असे काही करणे गरजेचे होते, ज्यामुळे जहाजांच्या सांगाड्यावर त्यांचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
सुरुवातीच्या काळात जहाजांच्या पाण्याखालील भागाला तांब्याचे पत्रे लावण्यात आले. यामागील मुख्य कारण म्हणजे सागरी जीवांना, विशेषत: किड्यांना लाकडी भागाकडे जाण्यापासून रोखणे हे होते. पण, काळाच्या ओघात यात संशोधन आणि सुधारणा होत गेल्या. याचीच परिणती म्हणून तांब्याच्या पत्र्याऐवजी आजकाल विशेष रंग वापरला जातो, ज्याला 'अँटीफॉलिंग पेंट' म्हणून ओळखले जाते. हे रंग तांब्याच्या पत्र्यासारख्याच तत्त्वावर कार्य करते ज्यात तांबे मुख्य घटक म्हणून वापरले जाते.
अँटीफॉलिंग हे कोणत्याही पाण्यात बुडलेल्या भागावर सागरी जीवांच्या वाढीचा सामना करण्यासाठी साहित्य आणि कोटिंग्ज डिझाइन करण्याचे शास्त्र आहे. या रंगाला कॉपर ऑक्साईड असेही म्हणतात. कॉपर ऑक्साईडला लाल रंगाची छटा असते. हा रंग नेहमी जहाजांच्या पाण्यात असणाऱ्या भागाला दिला जातो.
सुरुवातीला यामध्ये ट्राय-ब्यूटील टिन (टीबीटी) हा घटक प्रामुख्याने वापरला जात असे. परंतु वैज्ञानिक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की टीबीटी सागरी परिसंस्थेचे (ecosystem) लक्षणीय नुकसान करते.म्हणूनच, जहाज बांधणारे प्रामुख्याने आजकाल सेल्फ पॉलिशिंग पॉलिमर वापरतात, ज्याला सेल्फ-इरोडिंग पेंट असेही म्हणतात. हे पर्यावरणास अनुकूल पद्धतींवर अधिक अवलंबून आहे.
हा रंग देखील अशा प्रकारे तयार केला जातो की जहाजाच्या हालचालींमुळे, सतत पाण्याचा मार सहन केल्याने, त्याची धूप होते. त्यामुळे, नवीन प्रवासासाठी निघताना प्रत्येकवेळी एक नवा थर देण्यात येतो, जेणेकरून समुद्री जीवांचे जहाजाच्या पृष्ठभागावर प्रजनन होण्यापासून रोखता येते.