मध म्हटलं की, कोणाच्याही डोळ्यांसमोर एक गोड आणि चिकट पिवळा पदार्थ येतो. अनेकांना तर लगेच चवही आठवू लागते. भारतात मध तसं फार जास्त महाग नाही. फार पूर्वीपासून मधाचा वापर भारतातील घराघरात केला जातो. आयुर्वेदातही याचं महत्व सांगितलं आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला जगातली सर्वात महाग मधाबाबत सांगणार आहोत. तुर्कीतील एक कंपनी जगातील सर्वात महाग मध विकते. या मधाची किंमत वाचून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल.
जगातील सर्वात महागडं मध विकणाऱ्या कंपनीचं नाव आहे सेनटौरी. या कंपनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमद्ये आपली जागा बनवली आहे. या कंपनीकडून विकलं जाणारं मध हे सामान्य मध नाही. हे जगातील सर्वात महाग मध समुद्र सपाटी पासून जवळपास २५०० मीटर उंचीवरील एका गुहेतून काढलं जातं.
आता तुम्हाला वाटणं सहाजिक आहे की, हे मधही इतर मधाप्रमाणे चवीला गोड असेल. तर असं अजिबात नाहीये. सामान्य मधाच्या तुलनेत हे मध थोडं कडवट असतं. असे म्हणतात की, हे मध भलेही चवीला थोडं कडवट असेल, पण याचे फायदेही अनेक आहेत.
या मधामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि अॅंटीऑक्सिडेंटसहीत अनेक तत्व असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. सामान्यपणे इतर ठिकाणी मध हे वर्षातून दोन-तीन वेळा काढलं जातं. पण इथे ही कंपनी वर्षातून एकदाच मध काढते. हे मध काढल्यावर तुर्की फूड इन्स्टिट्यूटमध्ये पाठवलं जातं. जिथे त्याची क्वालिटी चेक केली जाते. त्यानंतरच ते विक्रीसाठी पॅक केलं जातं.
आता तुम्हाला हे जाणून घ्यायची इच्छा झाली असेल की, या मधाची किंमत किती आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, जगातल्या सर्वात महाग मधाची किंमत ८.५ लाख रूपये प्रति किलोग्रॅम इतकी आहे.