Asian Games 2018: भारताचा कबड्डीमध्ये फक्त एका गुणाने पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 04:28 PM2018-08-20T16:28:38+5:302018-08-20T16:30:25+5:30
जर अजयने दोन गुण मिळवले असते, तर भारताला विजय मिळवता आला असता. त्याचबरोबर जर एक गुण मिळवता आला असता तर हा सामना 23-23 असा बरोबरीत सुटला असता.
जकार्ता : आशिया क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये आतापर्यंत देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या भारताच्या संघाला दक्षिण कोरियाकडून फक्त एका गुणाने पराभव पत्करावा लागला. कोरियाने या थरारक लढतीत भारतावर 24-23 असा विजय मिळवला.
Men's Kabaddi | In a major upset, India go down to South Korea 23-24 in their 3rd group match
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 20, 2018
This is the India's first defeat in Asian Games history! #AsianGames2018pic.twitter.com/kpPS2Fi3I1
सामन्याच्या सुरुवातीपासून कोरियाने सामन्यावर पकड मजबूत केली होती. कोरिया आणि भारत यांच्यातील गुणांमध्ये जास्त फरक दिसत नव्हता, पण प्रत्येक वेळी कोरियानेच आघाडी घेतलेली होती. अखेरच्या सेकंदामध्ये भारताच्या अजय ठाकूरने अखेरची चढाई करायला घेतली. त्यावेळी कोरियाचे 23 आणि भारताचे 22 गुण होते. यावेळी जर अजयने दोन गुण मिळवले असते, तर भारताला विजय मिळवता आला असता. त्याचबरोबर जर एक गुण मिळवता आला असता तर हा सामना 23-23 असा बरोबरीत सुटला असता.
अखेरची चढाई सुरु असताना कोरियाचा एका खेळाडूचा पाय मैदानाच्या बाहेर गेला. तेव्हा भारताला एक गुण मिळाला. त्यावेळी अजय मागे परतत असताना त्याला कोरियाच्या बचावपटूने बाहेर ढकलले. त्यावेळी कोरियालाही एक गुण मिळाला आणि या गुणाच्या जोरावर कोरियाने भारतावर मात केली.