बेंगाल वॉरियर्सने केली पटणा पायरेट्सची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 01:51 AM2019-08-23T01:51:24+5:302019-08-23T01:51:48+5:30
जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बेंगालचा मनिंदर सिंग आणि पटणाचा ‘रेकॉर्ड ब्रेकर’ प्रदीप नरवाल यांच्यामध्ये अपेक्षित लढाई रंगली.
चेन्नई : सांघिक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या बेंगाल वॉरियर्सने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पटणा पायरेट्सचा ३५-२६ असा पराभव करुन प्रो कबड्डी लीगमध्ये विजयी आगेकूच केली. या दमदार विजयासह बेंगाल संघाने गुणतालिकेत ३३ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली असून पटणा संघ १७ गुणांसह तळाला आहे. पटणाने आपल्या नऊ सामन्यांतून सहा पराभव पत्करले आहेत.
जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बेंगालचा मनिंदर सिंग आणि पटणाचा ‘रेकॉर्ड ब्रेकर’ प्रदीप नरवाल यांच्यामध्ये अपेक्षित लढाई रंगली. दोघांनी आपापल्या संघासाठी तुफानी चढाया करताना ‘सुपर टेन’ कामगिरी केली. मनिंदरने १० गुण, तर प्रदीपने १२ गुणांची कमाई केली. मात्र फरक राहिला तो सांघिक खेळाचा. एकीकडे पटणाचा प्रदीप एकामागून एक गुणांची वसूली करत असताना त्याला सहकारी खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.
स्पर्धा इतिहासामध्ये मनिंदरने २६व्यांदा सुपर टेन कामगिरी केली, तर त्याचवेळी प्रदीपने तब्बल ४८व्यांदा असा पराक्रम केला. दुसरीकडे, मनिंदरला आपल्या सहकारी खेळाडूंकडून मोलाची साथ मिळाली. के. प्रपंजन (६) आणि रिंकू नरवाल (५) यांनीही शानदार खेळ करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. रिंकूने भक्कम पकडी करताना पायरेट्सचे आक्रमण खिळखिळे केले. मध्यंतराला बेंगालने १५-१४ अशी नाममात्र आघाडी घेतली होती. यानंतर तुफानी खेळ करत बेंगालने पटणाच्या आव्हानातली हवा काढली. प्रदीपने तुफानी खेळ केला, मात्र सांघिक खेळाचा अभाव पायरेट्सच्या पराभवास कारणीभूत ठरला.