कबड्डी मास्टर्स : भारताची दिमाखात अंतिम फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 01:41 AM2018-06-30T01:41:09+5:302018-06-30T01:41:46+5:30
अंतिम सामन्यात जेतेपदासाठी इराणचे कडवे आव्हान; पाकिस्तान उपांत्य सामन्यात गारद
दुबई : बलाढ्य भारतीय संघाने अपेक्षित कामगिरी करताना दक्षिण कोरियाचा ३६-२० असा एकतर्फी पराभव करताना कबड्डी मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदासाठी शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारतापुढे झुंजार इराणचे कडवे आव्हान असेल. अन्य लढतीत इराणने पाकिस्तानचा धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरी गाठली.
भारताविरुद्ध कोरियाची मदार पूर्णपणे जँग कुन ली याच्यावर होती. त्याने अपेक्षित खेळ केलाही, मात्र इतर खेळाडूंकडून त्याला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. कर्णधार अजय ठाकूर आणि गिरिश एर्नाक यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर भारताने मध्यंतराला १६-९ अशी मोठी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. मध्यंतरानंतर कोरियाकडून थोडाफार प्रतिकार झाला खरा, परंतु कसलेल्या भारतापुढे त्यांचा निभाव लागला नाही.
दुसºया सत्रात अजयसह गिरिशने आणखी भक्कम पकडी करताना कोरियाच्या आक्रमणातली हवा काढली. त्याचवेळी मोनू गोयत आणि फॉर्ममध्ये असलेल्या रिशांक देवाडिगा यांनीही खोलवर चढाया करताना कोरियाच्या बचावफळीला खिंडार पाडले. मोठी आघाडी मिळवल्यानंतरही भारताने कोरियाला कोणतीही दयामाया न दाखवताना पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.
दुसरीकडे अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात इराणने शानदार बाजी मारताना अनुभवी पाकिस्तानचा ४०-२१ असा फडशा पाडला. यासह अंतिम फेरीत धडक मारलेला इराण जेतेपदासाठी भारताच्या तगड्या आव्हानास सामोरे जाईल. मध्यंतराला १९-९ अशी आघाडी घेतल्यानंतर इराणने दुसºया सत्रात आणखी वेगवान व आक्रमक खेळ करत पाकिस्तानचा सहज धुव्वा उडवला. दुसºया सत्रामध्ये पाकिस्तानकडून पुनरागमनची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या चढाईपटूंकडून अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली.