- रोहित नाईकमुंबई : ‘यंदाच्या मोसमात मला मानसिकरीत्या कणखर होणे गरजेचे होते आणि मी त्याप्रमाणे स्वत:ला तयार करीत आहे. कारण स्पर्धेच्या पहिल्याच टप्प्यात दुखापत झाली, तर त्यातून सावरणे कठीण होते. सुरुवातीला मला दुखापतही झाली, पण मानसिकरीत्या स्वत:ला कणखर ठेवल्याने कमी वेळेत मी पुनरागमन करू शकलो,’ असे यूपी योद्धा संघाचा स्टार कबड्डीपटू रिशांक देवाडिगा याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मूळचा मुंबईकर असलेल्या रिशांकचे यूपी संघाच्या वाटचालीत मोलाचे योगदान आहे. यंदा पहिले दोन सामने गमावल्यानंतर यूपी संघाने तिसऱ्या सामन्यात यू मुम्बाविरुद्ध वरळीतील एनएससीआय स्टेडियममध्ये पहिला विजय मिळवला. तंदुरुस्तीवर अधिक भर देत असल्याचे सांगताना रिशांकने सांगितले की, ‘प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे आणि त्यादृष्टीने तंदुरुस्ती राखणे महत्त्वाची आहे. खेळताना दुखापत होणारच, पण दुखापत झाल्यानंतर कोणतेही दडपण न घेता योग्य ती काळजी घेण्यावर माझा भर आहे. तीन महिने ही स्पर्धा खेळायची असून सातत्यपूर्ण कामगिरीसाठी तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे.’ युवा खेळाडूंच्या चमदार कामगिरीमुळे वरिष्ठ खेळाडूंवर कोणतेही दबाव नसल्याचे स्पष्ट करताना रिशांक म्हणाला की, ‘युवा खेळाडूंनी चांगलीच छाप पाडली आहे. खेळासाठी आणि लीगसाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे. असे असले तरी युवा खेळाडूंमुळे वरिष्ठ किंवा अनुभवी खेळाडूंवर कोणतेही दडपण आलेले नाही. सर्वच वरिष्ठ खेळाडू आपल्या अनुभवाचा फायदा युवा खेळाडूंना करुन देत आहेत.’ वाकोला येथे वास्तव्यास असलेल्या रिशांकने मुंबईत खेळण्याचा अनुभव वेगळाच असतो असे सांगताना म्हटले की, ‘मुंबईमध्ये खेळणे मला नेहमीच आवडते. माझा आताचा संघ जरी वेगळा असला, तरी येथे मला कायमच मोठा पाठिंबा मिळतो. येथील वातावरणच वेगळे आहे. यंदाच्या मोसमातील आमचा पहिला विजयही मुंबईतच मिळाला आणि या विजयात मी योगदान देऊ शकलो याचा आनंद आहे.’लीगच्या पहिल्या सत्रापासून आतापर्यंत या खेळात खूप बदल झाले आहेत. आता जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा, खूप मोठा पल्ला गाठल्याचे दिसते. ही लीग इतकी मोठी होईल याची अपेक्षाच केली नव्हती. आज कुठेही गेलो तरी लोक नावाने ओळखतात आणि याचाच सर्वाधिक आनंद आहे. या लीगचा एक भाग असल्याचा खूप आनंद आहे.- रिशांक देवाडिगा
मानसिक तंदुरुस्तीही अत्यंत महत्त्वाची!- कबड्डीपटू रिशांक देवाडिगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 6:08 AM