मुंबई, नागपूर, एसएनडीटी भारती विद्यापीठ कबड्डी संघांची प्रत्येकी दोन गुणांची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 07:29 PM2019-12-08T19:29:55+5:302019-12-08T19:30:48+5:30
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिलांचे सामने निर्णायक अवस्थेत
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत मुंबई विद्यापीठ, मुंबई, एस.एन.डी.टी. मुंबई, आर.एस.टी.एम. विद्यापीठ, नागपूर व भारती विद्यापीठ, पुणे विद्यापीठाने रविवारी झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली आहे.
रविवारी पहिल्या साखळी सामन्यात मुंबई विद्यापीठ संघाने भारती विद्यापीठ, पुणे संघाचा ४२-२१ असा २१ गुणांनी दारूण पराभव केला. प्रारंभापासून मुंबई संघाने आक्रमक धोरण स्वीकारत पुणे संघाला नामोहरण केले. मुंबई विद्यापीठातर्फे मेघा कदम आणि प्रतीक्षा हिने दमदार चढाई करत संघाला बढत मिळवून दिली. भारती संघातर्फे पूनम तांबे आणि आदिती जाधव यांचा प्रतिकार अपयशी ठरला. दुसºया सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ संघाने एस.एन.डी.टी., मुंबई संघाचा चुरशीच्या लढतीत ३५-२९ असा ६ गुणांनी पराभव केला. अंजली रावत हिने शानदार चढाई करत आपल्या संघासाठी गुणांची कमाई केली.
दुपारच्या सत्रात झालेल्या तिसऱ्या साखळी सामन्यात एस.एन.डी.टी.,मुंबई संघाने मुंबई विद्यापीठ, मुंबई संघाचा ३०-२६ असा ४ गुणांनी पराभव केला. दोन्ही मुंबई संघात झालेला हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. एस.एन.डी.टी.मुंबई तर्फे ऋतिका हनुमाने हिने उत्कृष्ट चढाई करत तर दीक्षा जोरे व प्रतीक्षा यांनी उत्कृष्ट पकडीच्या जोरावर मुंबई विद्यापीठ संघावर वर्चस्व गाजविले. चौथ्या साखळी सामन्यात भारती विद्यापीठ संघाने नागपूर विद्यापीठ संघाचा ३३-२९ असा ४ गुणांनी पराभव केला. हा सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मध्यंतरांपर्यंत भारती विद्यापीठ, पुणे संघ २०-१८ असा २ गुणांनी आघाडीवर होता. पूनम तांबे आणि आदिती जाधव यांनी चपाळीने चढाई करत आपल्या संघाला गुणांची बढत मिळवून दिली. मानसी सावंत आणि काजल यांनी उत्कृष्ट पकड करीत संघासाठी मोलाची कामगिरी बजावली. हे सर्व सामने आंतरराष्ट्रीय पंच व स्पर्धा निरीक्षक पदमाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खेळविण्यात आले.