मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वासाठी झालेल्या लिलावात सर्वांनी नव्याने संघबांधणी केली. प्रत्येक संघाने आपला 'हुकमी एक्का' सोबत ठेवून संपूर्ण संघ बदण्यावर भर दिला. मात्र, या लिलावात यू मुंबाने 'कॅप्टन कूल' अनुप कुमारला बाहेर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. हाच अनुप सहाव्या पर्वात जयपूर पिंक पँथर्सचे नेतृत्व सांभाळत आहे. बुधवारी त्याने माजी संघ यू मुंबाविरुद्ध साजेशी कामगिरी केली नसली तरी जयपूरचे संघमालक आणि बॉलिवूड नायक अभिषेक बच्चनचा त्याचावर पूर्ण विश्वास आहे.
यू मुंबाविरुद्धच्या सामन्यात जयपूरने संघात सहा नवीन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली होती. सुरुवातीला आघाडी घेऊनही जयपूरला हा सामना 39-32 असा गमवावा लागला. तो म्हणाला,''संघाची पुनर्बांधणी करण्याचे आम्ही ठरवले होते. त्यामुळे आम्ही युवा खेळाडूंनी संधी दिली, परंतु त्याचबरोबर अनुभवाची जोडही आम्हाला हवी होती. अनुप कुमारच्या रुपाने ती आघाडी आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. कॅप्टन कूल असला तरी त्याच्या आक्रमणाचे प्रतिस्पर्धींकडे उत्तर नसते. तसेच बचावातही तो उत्तम कामगिरी करत आला आहे. त्यामुळे संघातील युवा खेळाडूंना त्याच्याकडून बरेच काही शिकायला मिळेल.''
प्रदीर्घ लीगमुळे दुखापतीचे प्रमाणही वाढण्याची भीतीयंदा लीगचा कालावधी लक्षात घेता खेळाडूंच्या दुखापतीची चिंता अभिषेकला सतावत आहे. तो म्हणाला,''ही लीग बराच काळ चालणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या दुखापतीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी आमच्यासह सर्वच संघांनी काहीतरी रणनिती नक्की आखली असेल.''