चेन्नई : अखेरच्या पाच मिनिटांत यू मुंबाने जबरदस्त खेळ केला. सिद्धार्थ देसाईच्या एकहाती खेळाच्या जोरावर यू मुंबाने अखेरच्या दोन मिनिटांत 38-30 अशी आघाडी घेत विजय जवळपास निश्चित केला. यू मुंबाने हा सामना 39-32 असा जिंकला
पहिल्या सत्रात नाममात्र आघाडी घेणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सला मध्यंतरानंतर खेळ उंचावता आला नाही. यू मुंबाने त्यांना कडवी टक्कर दिली. पुन्हा एकदा सिद्धार्थ देसाईने परफेक्ट 10 गुण कमावत संघाची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू ठेवली आहे.
यू मुंबाने मध्यंतरानंतर दमदार पुनरागमन करताना पिछाडीवरून 26-25 अशी आघाडी घेतली. मात्र जयपूरने कमबॅक केले. अखेरच्या पाच मिनिटापर्यंत जयपूरकडे 30-26 अशी आघाडी होती.
जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो कबड्डी लीगमध्ये पहिल्या दहा मिनिटांत यू मुंबाला ऑल आऊट केले आणि मजबूत आघाडी घेतली. संदीप धुलने या आघाडीत मोठी भूमिका बजावली. जयपूरने पहिल्या सत्रात 15-13 अशी आघाडी घेतली आहे.
जयपूर पिंक पँथर्सने पहिल्या पाच मिनिटांत 5-2 अशी आघाडी घेतली आहे. त्यात भर घालताना जयपूरने पहिल्या दहा मिनिटांत 11-5 अशी आघाडी घेतली.
प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात आज यू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स यांच्यात सामना होणार आहे. यू मुंबाचा माजी कर्णधार अनुप कुमार यंदा जयपूरकडून खेळत आहे. त्यामुळे हा सामना अनुप कुमार विरुद्ध यू मुंबा असा होण्याची शक्यता अधिक आहे.
(Pro Kabaddi League 2018: अनुप कुमार पाच वर्षांत आज प्रथमच यू मुंबाविरुद्ध खेळणार)