मुंबई : तमिळ थलायव्हाज संघाला प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. बेंगळुरु बुल्सने 48-37 अशा फरकाने विजय मिळवला. थलायव्हाजचा हा सलग तिसरा पराभव ठरला. या सामन्यात बेंगळुरू संघाचा पवन शेरावत ( 20 गुण) चमकला असला तरी काशीलिंग अडकेने एका विक्रमाला गवसणी घातलाना 'कॅप्टन कूल' अनुप कुमारलाही मागे टाकले.
बुधवारी झालेल्या यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्याली सामन्यात अनुपला एक विक्रम करण्याची संधी होती. या सामन्यात चढाईत 11 गुणांची कमाई केल्यानंतर अनुपच्या खात्यातील चढाईतील गुणसंख्या एकूण 500 होणार होती. मात्र, त्याला तीनच गुण कमावता आले. दुसरीकडे तमिळ थलायव्हाज आणि बेंगळुरू बुल्स यांच्यातील सामन्यात बेंगळुरूच्या काशीलिंगने 9 गुणांची ( 6 चढाईचे व 3 बोनस) कमाई केली.
चढाईतील सहा गुणांसह त्याने 500 गुणांचा पल्ला ओलांडला. त्याच्या खात्यात आता 73 सामन्यांत 503 गुण आहेत आणि अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्राचा पहिलाच खेळाडू, तर एकून पाचवा खेळाडू ठरला आहे. या क्रमवारीत तेलुगु टायटन्सचा राहुल चौधरी ( 675) आघाडीवर आहे. त्यानंतर पाटणा पायरेट्सचा प्रदीप नरवाल ( 636), तमिळ थलायव्हाजचा अजय ठाकूर ( 582), जयपूर पिंक पँथर्सचा दीपक निवास हुडा ( 516) यांचा क्रमांक येतो.