चेन्नई : तमिळ थलायव्हाज संघाला प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. बेंगळुरु बुल्सने 48-37 अशा फरकाने विजय मिळवला. थलायव्हाजचा हा सलग तिसरा पराभव ठरला.
पवन शेरावतच्या (17) दमदार कामगिरीच्या जोरावर बेंगळुरु बुल्सने पहिल्या सत्रात 28-12 अशी मोठी आघाडी घेतली. पवनला आशिष सागवान ( 6) आणि काशिलिंग आडके (2) यांची उत्तम साथ लाभली. पहिल्या सत्रात बेंगळुरुने तमिळ थलायव्हाजवर एक लोण चढवला. मध्यंतरानंतर बेंगळुरूने आणखी एक लोण चढवत ही आघाडी 34-14 अशी भक्कम केली. अखेरच्या दहा मिनिटांत खेळ चुरशीचा झाला. अजय ठाकूर, अतुल एमएस आणि मनजीत छिल्लर यांनी चढाईत गुणांचा सपाटा लावताना तमिळची पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. अजयने आणखी एक सुपर 10 गुणांची कमाई केली. पण, त्यांना पराभव टाळता आला नाही. अखेरच्या पाच मिनिटापर्यंत बेंगळुरूने 13 गुणांची आघाडी घेतली होती.