मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वातील चार सामने झाले असून विक्रमांची सुरूवातही झाली आहे. तमिळ थलायव्हाजने गतविजेत्या पाटणा पायरेट्सला धक्का देताना विजयी सलामी दिली. पण, दुसऱ्या लढतीत त्यांना यूपी योद्धाकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात तमिळचा पराभव झाला असला तरी अष्टपैलू मनजीत छिल्लरने एका विक्रमाला गवसणी घातली. यूपी योद्धाने हा सामना 37-32 असा जिंकला.
प्रो कबड्डी लीगमध्ये पकडीचे सर्वाधिक 250 गुण पटकावण्याचा विक्रम मनजीतने नावावर केला. 250 गुणांचा पल्ला गाठणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने एकूण 76 सामन्यांत 250 गुणांची कमाई केली आहे. त्यापैकी या सत्रात दोन सामन्यांत केवळ सातच गुण त्याला कमावता आले आहेत. पकडीच्या सर्वाधिक गुण पटकावणाऱ्या खेळाडूंमध्ये सुरेंदर नाडा ( हरयाणा स्टीलर्स) 71 सामन्यांत 222 गुणांसह दुसऱ्या, तर संदीप नरवाल ( पुणेरी पलटण ) 85 सामन्यांत 217 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
यासह प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वाधिक 20 हाय फाईव्हचा विक्रमही त्याने नावावर केला. याआधी सुरेंदर नाडा आणि मनजीत यांच्या नावावर प्रत्येकी 19 हाय फाईव्ह होते. सोमवारी मनजीतने एक हाय फाईव्हची कमाई करताना सुरेंदरला पिछाडीवर टाकले. मनजीतच्या नावावर 76 सामन्यांत 20 हाय फाईव्ह आहेत.