डोंबिवली - कचरा उचलण्याच्या आणि पैशाच्या वादातून दिवसाढवळ्या कल्याणरेल्वे स्थानकात फलाट 1 वर एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी अखेर अशोक लोदी नावाच्या आरोपीला रेल्वे क्राईम ब्राँचच्या पथकाने मशीद बंदर येथून अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस आरोपीच्या शोधत होती.
कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 वर 3 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तीन तरुण आपसात भांडत होते. या भांडणा दरम्यान एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने हल्ला करुन त्याचा खून केला. नंतर तो फरार झाला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या फलाटावर अचानक लोकल गाडी आली. लोकलमधून प्रवासी उतरले. हा आरोपी त्या गर्दीत सामील झाला. सीसीटीव्हीत स्पष्ट होत नव्हते की, नक्की हा आरोपी कोणत्या दिशेने पसार झाला आहे.
कल्याण जीआरपी हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध घेत होते. रेल्वे पोलिसांकडे तीनही आरोपींचे नाव, पत्ता नव्हता. केवळ सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरु होता. कल्याण क्राईम ब्रांचने तपासादरम्यान तीन पैकी एक तरुण शंकर राठोड याला ताब्यात घेतले. मात्र त्याला मयत आणि आरोपी यांची नावे माहित नव्हते. हा देखील आश्चर्याचा विशय होता. अखेर 9 दिवसांनंतर रेल्वे क्राईम ब्रांचला या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले.
या आरोपीच्या शोधात क्राईम ब्रांच पोलिसांची पाच पथके तपास करीत होती. अखेर आरोपीला मशीद बंदर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव अशोक लोदी आहे. तो मूळचा भोपाळचा राहणारा आहे. तीन महिन्यांपूर्वीच तो मुंबईला आला होता.
मयत नारायण मरावी आणि अशोक लोदीमध्ये कचरा उचलण्यावरुन आणि पैशाच्या देवाणघेवाणीवरुन वाद झाल्याने संबंधित प्रकार घडला होता. संध्याकाळी गजेंद्र पाटील यांच्यासह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे अधिकारी अरशद शेख यांच्या पथकाने अशोक लोदी या आरोपीला कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांच्याकडे सोपविले. याप्रकरणाचा पुढील तपास कल्याण जीआरपी करत आहेत.