- मयुरी चव्हाण
कल्याण- कल्याणडोंबिवली महानगर पालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लससाठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावी लागत आहे. त्यामुळे उद्याच्या भरवशावर अवलंबून न राहता आपल्याला आजच लस मिळावी या प्रयत्नात नागरिक आहेत. लसीचा साठा उपलब्ध झाल्याचा मेसेज केडीएमसीकडून मिळताच नागरिक टोकन घेण्यासाठी मध्य रात्रीपासूनच लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. केवळ आपल्याला लस मिळावी म्हणून तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही दिवस रात्र करून लसीकरण केंद्राबाहेर बसत आहेत. त्यातच नागरिक जास्त येत असल्याने टोकनही कमी पडू लागले आहेत. रात्री रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना टोकन मिळत आहेत मात्र सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास लसीकरण केंद्रांवर जाणाऱ्या नागरीकांना पुन्हा घरी जावे लागत असल्याचे चित्र आहे. तर बहुतांश ठिकाणी शाब्दिक चकमकीचे प्रकारही वाढले आहेत.
बेड, ऑक्सिजन, औषध यासाठी करावी लागणारी धावपळ आता लसीकरणावर येऊन ठेपली आहे. सुरवातीला लसीकरणावरून नाकं मुरडनारे नागरिक आता लसीसाठी जंग जंग दिसत आहेत. नागरिकांना जास्त वेळ बसून ठेवण्यापेक्षा टोकन देऊन त्या त्या वेळेनुसार लसीकरण करण्याकडे काही केंद्रांचा कल दिसतो. गेल्या दोन आठवड्यात लसीकरणाला वारंवार ब्रेक लागत असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे.लस उपलब्ध होईल की नाही याचा सध्या काही भरवसा नसल्याने नागरिक टोकनसाठी रात्रीपासून रांगा लावत आहेत.
डोंबिवलीतील शिवमंदिर जवळील असलेल्या शाळेतील लसीकरण केंद्रावर सोमवारी टोकनमूळे काही काळ गोंधळ उडाला होता. या ठिकाणी काही नागरिक रात्री एक वाजल्यापासून रांग लावून उभे होते. त्यामुळे सकाळी टोकन घ्यायला आलेल्या नागरिकांना पुन्हा घरचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते . काहींना रात्री तर काहींना सकाळी टोकन दिले गेल्याचा आरोप काही नागरीकांना केला. तसेच टोकन नेमकं देतात तरी कधी? असा सवालही उपस्थित केला आहे.मात्र टोकन सकाळी 6 ते 7 या वेळेतच दिले जाते असे सेना पदाधिकारी सागर जेधे यांनी सांगितले .
टोकन वाटपाची एक वेळ ठेवणं निश्चित आहे. काहींना रात्री तर काहींना सकाळी टोकन वाटले गेले. सकाळी सात वाजताच टोकन संपल्याचा बोर्ड लावण्यात आला. त्यामुळे काहींना घरी जावे लागले.
- सचिन गवळी , नागरिक
आम्ही लसीकरण केंद्रावर नागरिकांना नेहमी मदत करतो. मात्र जेव्हा जेव्हा लस उपलब्ध होते तेव्हा सकाळी 6 ते 7 या वेळेतच टोकन वाटले जाते. अलीकडे लससाठा कमी असल्याने लस मिळते की नाही?या विवंचनेत नागरिक रात्रीपासूनच टोकन साठी रांगा लावत आहेत.
-सागर जेधे, शिवसेना पदाधिकारी.