कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतून माजी नगरसेवक मोहन उगले यांचेच नाव गायब झाले आहे. माजी नगरसेवकाचे नाव गायब होत असेल, तर सामान्य मतदाराची काय गत असेल? असा संतप्त सवाल उगले यांनी उपस्थित करत मतदार याद्यात सावळा गोंधळ असल्याचा आरोप केला आहे.
मतदार याद्यामधील नाव नोंदणी संदर्भात माजी नगरसेवक उगले यांनी त्यांच्या प्रभागातील मतदारांना आवाहन केले होते. यावेळी मतदार यादी पाहत असताना उगले यांचेच नाव मतदार यादीतून गायब आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या वेळी माजी नगरसेवक उगले यांचे नाव होते. आत्ता अंतिम यादीतून त्याचे नाव वगळण्यात आल्याने त्यांनी थेड निवडणूक अधिकारी वर्षा थळकर यांची भेट घेऊन यादीतून नाव कसे काय गायब झाले असा सवाल उपस्थित करीत अंतिम यादीत पुन्हा नाव समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी केली आहे. माजी नगसेवक उगले हे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातील माजी नगरसेवकाचे नावच मतदार यादीतून गायब होत असेल तर प्रशासनाकडून सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांवर अन्याय होत आहे. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी उगले यांनी केली आहे. निवडणूक अधिकारी थळकर यांनी उगले यांचे नाव समाविष्ट केले जाईल असे आश्वासन दिले आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांचा गाैप्यस्फाेटमात्र बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या भावासह त्यांच्या मुलाचे नाव मतदार यादीतून काढण्यासाठी कुणीतरी निवडणूक अधिकारी वर्गाकडे अर्ज केला होता. या अर्जा विषयी संशय आल्याने अधिकारी वर्गाने थेट आमदारांशी संपर्क साधला. त्यावेळी आमदार भोईर यांनी अशा प्रकारे नाव वगळण्याचा अर्ज आमच्याकडून केला गेला नसल्याचे सांगितले.
किती होते मतदार ?- कल्याण पश्चिम विधानसभा मतदा संघात ४ लाख ७८ हजार मतदार.- कल्याण पूर्व विधानसभा मतदा संघात ३ लाख ५७ हजार मतदार.- कल्याणग्रामीण विधानसभा मतदार संघात ४ लाख ४० हजार मतदार.- डोंबिवली विधानसभा मतदार संघात ३ लाख ७२ हजार मतदार.- चार विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण १६ लाख ४९ हजार २७० मतदर.
किती नावे वगळली ?त्यापैकी कल्याण पश्चिमेत १ लाख २२ हजार, कल्याण पूर्वेत ९२ हजार १९२, कल्याण ग्रामीणमध्ये ८२ हजार ३६४ आणि डोंबिवलीत १ लाख १७ हजार ९२ मतदार अशा एकूण ४ लाख १३ हजार मतदारांची यादीत छायाचित्रे नसल्याचे समोर आले होते . त्यापैकी १ लाख ६७ हजार ९०९ मतदारांची नावे मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर ते राहत नसल्याने वगळण्यात आली होती.कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातून आजमितीला १ लाख २२ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत .