उल्हासनगर : संविधान दिनाचे औचित्य साधून महापालिकेने संविधान दौडचे आयोजन शनिवारी सकाळी केले. संविधान दौड मध्ये महापालिका कर्मचाऱ्यासह नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून आयुक्त अजीज शेख यांनी यावेळी संविधाना बाबत माहिती दिली.
उल्हासनगरात संविधान दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने शनिवारी सकाळी संविधान दौडचे आयोजन करण्यात आले. चोपडा कोर्ट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा ते महापालिका दरम्यान दौड काढण्यात आली. यावेळी महापालिका कर्मचारी, सुरक्षा रक्षक, नागरिक, शालेय मुलांनी दौड मध्ये सहभाग घेतला. जगात सर्वात श्रेष्ठ म्हणून भारतीय संविधानाला गौरविण्यात आल्याची माहिती यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी दिली. अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, डॉ सुभाष जाधव, वैधकीय अधिकारी डॉ दीपक पगारे, जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कोरोना काळात कुटुंबासह स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, शेकडो कोरोना रुग्णांचा जीव वाचविणारे व कोरोना योध्दा म्हणून गौरविलेल्या कंत्राटी कर्मचारी गेल्या काही महिन्या पासून पगार विना आहेत. महापालिकेने जबाबदारी झटकल्याने,कोरोना योद्धा म्हणून गौरविलेले नर्स व वॉर्डबॉय यांना ठेकेदाराद्वारे महापालिकेने आरोग्य विभागात कामावर घेतले. महापालिकेने कोरोना काळात कंत्राटी कर्मचारी म्हणून थेट नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांवर ठेकेदारांच्या मनमानीमुळे उपासमारीची वेळ आली असून त्यांनी कायद्याने वागा संघटनेचे राज असरोडकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी महापालिके समोर आंदोलन केले. महापालिका वॉर्डबॉय यांना दरमहा २० हजार रुपये वेतन देत होती. तर ठेकेदार मनमानी करीत असल्याने, १६ हजार वेतन देत असल्याचा आरोप कोरोना योद्धा म्हणून गौरविलले कर्मचारी देत आहेत. त्यांनी महापालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी यावेळी केली आहे.