लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवलीत पुन्हा कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका हद्दीत पुन्हा २८ हॉटस्पॉट तयार झालेले आहेत. यात डोंबिवली शहर आघाडीवर आहे. यामुळे सुशिक्षितांच्या डोंबिवलीत कोरोनाचे नियम पाळले जात नाही का, असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे. डोंबिवलीतून मुंबई उपनगरात नोकरीच्या निमित्ताने मुंबईला जास्त प्रमाणात प्रवास केला जातो. तर कल्याण जंक्शन असलेल्या रेल्वेस्थानकातून लाखो लोक प्रवास करीत आहेत. रेल्वेसह अन्यही बरीच कारणे कोरोनावाढीस जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिका हद्दीत सुरुवातीला १० हॉटस्पॉट होते. त्यानंतर हा आकडा ३२ वर पोहचला. हॉटस्पॉट असलेल्या प्रभागात कडक निर्बंध लादले होते. आताच्या २८ हॉटस्पॉटमध्ये डोंबिवलीतील जयहिंद कॉलनी, गणेशनगर गरिबाचा वाडा, गावदेवी मंदिर, संतोषी माता मंदिर, देवी चौक, शास्त्रीनगर, भागशाळा मैदान, रामनगर, म्हात्रेनगर, खंबाळपाडा, सावरकर रोड, एकतानगर, देसलेपाडा, एमआयडीसी, ठाकूरवाडी, राजूनगर, आनंदवाडी, पाथर्ली या परिसराचा तर कल्याणमध्ये वायलेनगर, खडकपाडा, गंधारी, रामबाग, श्रीकॉम्प्लेक्स, शास्त्रीनगर, चिंचपाडा, तिसगाव या परिसराचा समावेश आहे.
सोयीसुविधांमुळे लोकांमध्ये वाढली बेफिकिरी
मागच्या वर्षी कोरोनाचा कहर झाला तेव्हा महापालिका हद्दीत आरोग्याच्या सेवासुविधा अपुऱ्या होत्या. त्यानंतर आरोग्याचा जंबो सेटअप उभारून कोविड केअर सेंटरपासून रुग्णालये सुरू करून टेस्टिंग सेंटर वाढविली आहेत. ॲन्टिजेन व आरटीपीसीआर या दोन्ही टेस्टची सुविधा केली असून कोरोना लसीकरणही सुरू आहे. या सगळ्या सोयीसुविधांमुळे नागरिकांमध्ये कोरोनाचे भय राहिले नसून त्यांच्यात बेफिकीरीपणा दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी केली जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा कामाला लागू शकतात. प्रसंगी राज्यासह महापालिकेत पुन्हा एकदा दहा दिवसांचा कडक स्वरूपाचा लॉकडाऊन लागू करण्याचा कठोर निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
लग्न समारंभ अथवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातून परतल्यावर लोकांची कोरोना चाचणी केल्यास ती हमखास पॉझिटिव्ह येत आहे. परिणामी नागरिकांनी लग्न सभारंभ आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होणे टाळावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे.
सभारंभ, पार्ट्यांमुळे वाढतोय कोरोना
लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : लग्न सभारंभ आणि पार्ट्यांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची कबुली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. येत्या १० दिवसांत परिस्थिती न बदलल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे.मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव मनपा हद्दीत सुरू झाला. त्यावेळी डोंबिवलीतील एका लग्न सभारंभातून कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. आता पुन्हा मनपा हद्दीत लग्न सभारंभ आणि पार्ट्या जोमात सुरू आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. शहरात होणारे लग्न समारंभ, पार्ट्या आणि सोशल गॅदरिंगवर मनपासह पोलिसांची करडी नजर आहे. यापूर्वी मनपाच्या पुढाकाराने सोशल गॅदरिंगप्रकरणी तीन जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, सोशल गॅदरिंग शहरात कमी असले तरी आता लग्नसराई आहे. कोरोना असला तरी नातेवाइकांच्या लग्नासाठी कल्याण-डोंबिवलीतील नागरिक जैयपूर, अहमदाबाद, अमरावती, इंदौर येथे जात आहेत.
रुग्णसंख्या रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणार एका इमारतीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्यास इमारतीमधील सर्वच रहिवाशांची रॅपिड ॲण्टिजेन चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी इमारतीमधील रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे. कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात येणार आहे. एका रुग्णामागे २० जणांची कोरोना चाचणी केली जाणार आहेत.
रॅपिड ॲण्टिजेन चाचणीचेही प्रमाण वाढविले जाणार आहे. मनपा हद्दीत ३२ टेस्टिंग सेंटर आहेत. तेथे दोन्ही प्रकारच्या चाचण्या करण्यात येत आहेत. १० दिवसांत रुग्णांची संख्या कमी न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.