डोंबिवली: डोंबिवली मोठागाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूलाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. हा पूल वाहतूकीसाठी येत्या एप्रिल महिन्यापासून खुला केला जाईल अशी माहिती शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे.
युवा सेना पदाधिकारी म्हात्रे यांनी आज खाडी पूलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, या पूलाचा कामाकरीता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महत्वपूर्ण पाठपुरावा केला आहे. त्यामुळे हे काम मार्गी लागत आहे. हे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून केले जात आहे. खासदारांनी मोठा गाव ते कोपर रस्त्यासाठी १८ कोटी, मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या रिंग रोडच्या तिस:या टप्प्याकरीता ५७० कोटीची निविदा एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर केली आहे. रेल्वे फाटकाच्या पुलाचे काम सुरु झाले आहे.
खासदारांमुळे विकास कामे मार्गी लागत आहेत. मोठा गाव ठाकूर्ली ते माणकोली खाडी कामाचा एक्सपान्शन जॉईन करणे हा शेवटचा टप्पा आहे. या कामाची पाहणी खासदार डॉ. शिंदे हे करणार आहेत. हा पूल वाहतूकीसाठी एप्रिल महिन्यात खुला होईल असे म्हात्रे यांनी सांगितले. हा पूल खुला होताच डोंबिवलीतून ठाणे अवघ्या काही मिनिटात गाठणे शक्य होणार आहे.