डोंबिवली : ठाकुर्ली पूर्वतील म्हसोबा चौकातील सर्वोदय हिल्स या गृहसंकुलाला आग लागल्याची घटना ५ नोव्हेंबरला घडली होती. या आगीत धुराने श्वास कोंडल्याने चौघांची प्रकृती गंभीर बनली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील अमोल कुलकर्णी (वय ३९) याची ३३ दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज शनिवारी अपयशी ठरली. संध्याकाळी त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आग लागली तेव्हा अमोल इतरांच्या मदतीसाठी धावला होता. त्याच्या ओढावलेल्या मृत्यूने नातेवाईक हळहळ व्यक्त करीत आहेत.
आगीमुळे निर्माण झालेल्या धुरात श्वास कोंडल्याचा त्रास इमारतीमधील काही रहिवाशांना झाला होता. काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. चौघांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांच्यावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अमोल कुलकर्णी, त्याची पत्नी वृषाली यांच्यावर अतिदक्षता विभागात, तर अन्य दोघांवर जनरल विभागात उपचार सुरू होते. अमोल आणि वृषाली यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना मुलुंडच्या खासगी रुग्णालयात हलविले होते. वृषालीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला जनरल वॉर्डमध्ये हलविले आहे.
अमोलवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर शनिवारी संध्याकाळी अमोलची प्राणज्योत मालवली. रात्री त्याच्या पार्थिवावर शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.