डोंबिवली: महावितरणच्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा सुरक्षित व सुलभ असून अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेऊन वेळ व श्रमाची बचत करावी. तसेच पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ व ‘सोलर रुफ टॉप’ योजनेत सहभागी होऊन वीजबिलात बचत करावी. यासह विविध ग्राहकसेवांचा जागर करण्यासाठी महावितरणकडून दुर्गाडी देवीच्या दरबारात दालन उभारून जनजागृती व ग्राहकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने दुर्गाडी किल्ला परिसरात साजऱ्या होणाऱ्या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. या भाविकांना महावितरणच्या विविध सेवा व योजनांची माहिती व्हावी, यासाठी दर्शनी भागात एक दालन उभारण्यात आले आहे. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या हस्ते नुकतेच या दालनाचे उदघाटन करण्यात आले.
महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन वीज भरणा करणाऱ्या ग्राहकांना सवलतही मिळते. ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभाग नोंदवून छापील वीजबिल नाकारणाऱ्या ग्राहकांना दरमहा प्रतिबिल दहा रुपयांची सवलत देण्यात येते. तर ‘सोलर रुफ टॉप’ योजनेत अनुदानाच्या माध्यमातून छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीजबिलात मोठी बचत करण्याची संधी मिळते. यासह विविध सेवा व योजनांची माहिती भाविकांना देण्यात येत आहे.
कल्याण पश्चिम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नितीन काळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनिष डाकरे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी या दालनाच्या माध्यमातून अधिकाधिक भाविकांपर्यंत महावितरणच्या सेवा व योजनांची माहिती पोहचवत आहेत.