कल्याण- कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरु आहे. स्टेशन परिसरात नो पार्किग आहे. त्याच ठिकाणी पोलीस त्यांच्या दुचाकी उभ्या करतात. पोलिसांनी बेशिस्तपणे रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या गाड्यांच्या विरोधात वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच नो पार्किगमध्ये गाड्या उभ्या करू नये, असे आवाहनही केले आहे. जवळपास १०० गाड्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाई करून पोलिसांच्याच बेशिस्तीला चांगलाच दणका बसला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसराचा विकास केला जात आहे. या विकास कामाला सुरुवात करण्यात आली आहे. स्टेशन परिसरातील दीपक हॉटेलपासून साधना हॉटेलर्पयत हे विकासाचे काम सुरु झालेले आहे. रस्त्याच्या मधोमध हे काम सुरु आहे. त्यासाठी मोठी यंत्र सामग्री लावली आहे. त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात वळवून काही थोडी जागा लहान आकारच्या गाड्या पास होण्यासाठी सोडण्यात आली आहे. कल्याणमध्ये आसपासच्या भागातून पोलीस, सरकारी कर्मचारी तसेच कल्याण न्यायालय, रेल्वे न्यायालय, तहसील कार्यालयात काम करणारा कर्मचारी वर्ग येतो. त्यांच्या दुचाकी स्टेशन परिसरात पार्किग केल्या जातात. त्यात पोलिसांच्याच अधिक गाड्या आहेत. स्टेशन परिसरात पार्किग केलेल्या पोलिसांच्या गाड्यांविरोधात वरिष्ठ पोलीसनिरिक्षक सुखदेव पाटील यांनी कारवाई केली आहे. ई चलानची कारवाई करण्यात आली आहे. त्यात वकिलांच्या गाड्यांचाही समावेश आहे. या कारवाई पश्चात बेशिस्तपणे गाड्या उभ्या करू नये. याठीकाणी स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही, असे आवाहन वरिष्ठ पोलीसनिरिक्षक पाटील यांनी केले आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामामुळे दिलीप कपोते वाहन तळ पाडण्यात आले. त्याठिकाणी नव्याने वाहनतळ उभारले जाणार आहे. तसेच स्कायवॉकचे पाडकाम सुरु आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होणाऱ्या पार्किगच्या विरोधात ही कारवाई सुरु केली आहे.