केडीएमटी घडवणार कल्याण-डोंबिवली शहरांचे दर्शन; पर्यटनाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 12:08 AM2021-03-27T00:08:04+5:302021-03-27T00:08:18+5:30
बस निर्मितीच्या कामाचा शुभारंभ, दर रविवारी ‘मुंबईदर्शन’साठी जशी बस चालविली जाते
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील गडकिल्ले, तलाव, जुनी मंदिरे, स्मारके तसेच विविध प्रकल्प अशा पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी आता केडीएमटी उपक्रमाने कंबर कसली आहे. नागरिकांना या स्थळांना भेट देणे शक्य व्हावे, यासाठी केडीएमटी उपक्रमाकडून पर्यटकांसाठी एक विशेष बस सोडण्यात येणार आहे. या बसचे भाडे नाममात्र राहणार असून, बसच्या निर्मितीच्या कामाचा शुभारंभ परिवहन सभापती मनोज चौधरी आणि सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आला. आगळा वेगळा लूक असलेल्या या बसच्या निर्मितीचे काम ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस’च्या विद्यार्थ्यांकडून केले जाणार आहे.
दर रविवारी ‘मुंबईदर्शन’साठी जशी बस चालविली जाते, त्याप्रमाणे कल्याण-डोंबिवली दर्शन बससेवा सुरू करण्याची मागणी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी हिरवा कंदील दाखविल्यावर त्या बसच्या निर्मितीच्या कामाचा शुभारंभ उपक्रमाच्या गणेश घाट आगारात करण्यात आला. यावेळी सभापती चौधरी, सदस्य बंडू पाटील, अनिल पिंगळे, आगार व्यवस्थापक संदीप भोसले आणि अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कल्याण स्थानक बाहेरून ही बस सोडण्याचे नियोजन आहे. येत्या दहा दिवसांत ही बस उपलब्ध होईल, अशी माहिती चौधरी यांनी दिली. टिटवाळा महागणपती मंदिर, डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान, ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला यांसह अन्य शहरातील महत्त्वाच्या अन्य स्थळांची चित्रे या बसवर साकारली जाणार असल्याने बसला वेगळाच लूक लाभणार असल्याचेही ते म्हणाले.
काय पाहाल?
टिटवाळा महागणपती मंदिर ते कल्याण शीळ मार्गावरील दत्त मंदिर अशी ही बस चालविली जाणार असून या दरम्यानच्या दुर्गाडी किल्ला, दुर्गाडी गणेश घाट, बारावे जलशुद्धीकरण केंद्र, काळा तलाव, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, आर्ट गॅलेरी, सुभेदारवाडा, डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर, शहीद कॅप्टन सच्चन स्मारक, शहरालगत असलेले खिडकाळी मंदिर, शीळ फाटा येथील दत्त मंदिर आदी पर्यटन आणि नयनरम्य स्थळांचा यात समावेश आहे.