बाप्पा बाप्पा बुद्धी द्या, पुढच्या वर्षी तरी होऊ द्या! आमदार राजू पाटील यांची राज्य सरकारवर होर्डिंगद्वारे टीका
By अनिकेत घमंडी | Published: September 9, 2022 06:16 PM2022-09-09T18:16:10+5:302022-09-09T18:17:36+5:30
रखडलेल्या उड्डाणपूल प्रकल्पावर मनसे आमदार राजू पाटील यांची राज्य सरकारवर होर्डिंगद्वारे टीका केली आहे.
डोंबिवली : शुक्रवारी अनंत चतुर्दशीनिमित्त सर्वत्र गणरायाच्या विसर्जनाचे वातावरण असताना मनसे आमदार राजू पाटील यांनी मात्र कल्याण शिळ महामार्गावर लावलेल्या होर्डिंग सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. बाप्पा बाप्पा बुद्धी द्या पुढच्या वर्षी तरी होऊ द्या असा मथळा लिहून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि नजीकच्या परिसरातील अपूर्ण प्रकल्पांवर त्यांनी टीकास्त्र सोडून थेट गणरायालाच राज्यकर्त्याना बुद्धी देण्याची विनवणी केली आहे.
त्यांचे वास्तव्य असलेल्या पलावा येथील जंक्शनवर अनेक वर्षे रखडलेला उड्डाणपूल, दिवा आगासन रोड, कल्याणचा लोकग्राम पूल, डोंबिवली शहरातील प्रवेशद्वार असलेला।मानपाडा रोड, एमआयडीसीमधील रस्ते, दिवा येथील रेल्वे उड्डाणपूल आदी प्रकल्प रखडलेले असून त्यांना आगामी वर्षभरात गती मिळावी अशी मागणी होर्डिंग्जद्वारे पाटील यांनी केली आहे. जनमानसात त्या बॅनरबाजीची जोरदार चर्चा सुरू असून प्रकल्प व्हायला हवेत अशी सामान्यांची मागणी असून ती आमदार पाटील यांनी उचलून धरली आहे. ते सगळे प्रकल्प त्यांच्या मतदारसंघाशी संलग्न असून वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील काहीही फरक पडत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असून अखेर गणरायाला अनंत चतुर्दशी निमित्ताने यावर्षी जाता जाता तरी राज्यकर्त्यांना बुद्धी दे आणि पुढच्या वर्षी ते प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्या चांगल्या स्थितीतून गणरायाचे आगमन व्हावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
मनसेने साधला निशाणा
मनसे आमदार पाटील हे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करत असतात, आता त्यांचे शुक्रवारी ठिकठिकाणी।लागलेले बॅनर देखील चर्चेचा विषय बनली असून त्याद्वारे त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील अर्धवट प्रकल्पांची जंत्रीच वाचून दाखवली असून ती उघडपणे मांडली असून त्यांना गती मिळावी अशी मागणी केली आहे.