डोंबिवलीडोंबिवली येथील प्रदूषणाच्या समस्येतून कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार घणाघात केला आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसरात प्रदुषणाचा वारंवार त्रास होत आहे. अनेकदा तक्रारी करुनही प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काही होणार नाही का? असा सवाल आमदार राजू पाटील यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
रसायनयुक्त पाण्यामुळे डोंबिवलीतील रस्ते निळे पडू लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसीतील कारखान्यांकडून रस्त्यावरच हे निळं पाणी सोडण्यात येत असल्याने ही समस्या उद्धवली असून डोंबिवलीकरांची डोकेदुखी ठरत आहे. राजू पाटील यांनी ट्विट करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचं या घटनेकडे लक्ष वेधलं आहे.
एमआयडीसी आणि प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी याकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याने या घटना घडत असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला आहे. रस्त्यावर आलेल्या रसायनमिश्रीत पाण्यामुळे गंभीर आजार उद्भवण्याचा धोका आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.