अनिकेत घमंडी, डोंबिवली: ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जो सॅटिस प्रकल्प उभा केला आहे त्याच धर्तीवर अत्यंत जलद गतीने शहरीकरण झालेल्या डोंबिवली सारख्या लाखो चाकरमान्यांची जो रोज नोकरी व्यवसाय निमित्त रेल्वे सेवेचा वापर करतात त्यांच्या साठीही सॅटिस प्रकल्प बांधण्यात यावा अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली.
त्यामुळे ठाण्यासारखेच डोंबिवलीकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी ठाणे शहर स्टेशन परिसरात जसा आपण नियोजनबद्ध आखणी करून ठाण्यासारख्या गर्दीच्या स्टेशन परिसरात सॅटिस सारखा यशस्वी प्रकल्प उभारून गर्दीवर व जलद प्रवासावर नियंत्रण मिळविले तसाच प्रकल्प डोंबिवली स्टेशन परिसरात होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
डोंबिवली पूर्व या गजबजलेल्या ठिकाणी स्टेशनला लागून असलेल्या रामनगर पोलीस मैदान, पोलीस स्टेशन व अनेक वर्ष धोकादायक इमारत म्हणून मोडकळीस आलेली व बंद असलेली पोलीस वसाहतीची मोठी इमारत व त्या मागे असलेला मोकळा भूखंड ज्याला जोडून डोंबिवली पूर्व पश्चिम ला जाणारा कोपरखोल रस्त्यापर्यंतचा मोकळा भूखंड या संपूर्ण तीन ते चार एकर परिसराचे योग्य नियोजन केले तर डोंबिवली पूर्वेला ठाण्यासारख्या भव्य व सर्व रस्त्यांना जोडणारा साठीच प्रकल्प आरामात निर्माण होऊ शकतो असे त्यांनी सुचवले.
त्याचप्रमाणे डोंबिवली पश्चिम हे शहर देखील नव्या लोकवस्तीमुळे पसरत गेलेले आहे तेथील स्टेशन परिसर हा देखील प्रचंड गर्दी व वाहतूक कोंडीने त्रस्त असतो त्यामुळे विष्णूनगर येथील रेल्वे स्टेशन समोरील व स्थलांतरित केलेल्या जुन्या विष्णुनगर पोलीस स्टेशनची इमारत व लगतचा रस्ता याचे योग्य नियोजन केल्यास या परिसरात देखील सुसज्ज असा सॅटिस प्रकल्प व त्याखाली संबंधित विकास प्रकल्प उभे राहू शकतात असेही।ते म्हणाले. डोंबिवलीकरांसाठी सॅटिस हा प्रकल्प सुद्धा एक "मैलाचा दगड" असाच असून त्यावर संबंधित खात्याकडून योग्य माहिती व अभ्यास करून तो लवकरात लवकर पूर्णत्वास यावा अशी मागणी या पत्राद्वारे करीत असल्याचे कदम म्हणाले.