कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण पूर्वेकडील 100 फिट रोड परिसरात असलेल्या काही सोसायट्यांची समस्या "लोकमत" ने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडली होती. अखेर या लोकमतच्या वृत्ताची दखल घेतली गेली असून या परिसरात असलेल्या खराब रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरवात झाली आहे. काम सुरू झाल्याची माहिती येथील नागरिकांनी लोकमतला दिली असून याबाबत "लोकमत समूहाचे" अभार देखील मानले आहे.
9 जून रोजी कल्याण डोंबिवली परिसराला मुसळधार पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी पाणी साचले. कल्याण पूर्वेतील 100 फिट रोड परिसरात असलेल्या काही सोसायट्यांचा परिसर जलमय झाला होता. रस्ते खराब असल्याने या ठिकाणी असलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. येथून मार्गस्थ होण्यासाठीही नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अक्षरशः एका ग्रामीण भागातील परिसरापेक्षा येथील अवस्था बिकट होती. याबाबत नागरीकांनी लोकमतशी संपर्क साधून व्यथा मांडली. त्यानंतर "लोकमत"ने ही सर्व परिस्थिती थेट फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडली.
अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने याची दखल घेत रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली असल्याचे कृष्णा हाईट्स या सोसायटीत राहणारे नागरिक अशोक कालसप्रे यांनी सांगितले. तसेच पावसाळा संपला की या ठिकाणी पक्का रस्ता करून देण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे ते म्हणाले. लोकमत हे तुमच्या हक्काचे व्यासपीठ आहे . तुमच्या परीसरातील समस्या आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.