कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्पोर्ट स्कूल सुरु करण्याच्या मागणीसाठी आज डोंबिवलीतील जय भारत इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांसह संचालकांनी महापालिका उपायुक्त स्नेहा कर्पे यांची भेट घेतली. उपायुक्ताना निवेदन देण्यात आले. शाळेच्या या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे उपायुक्त कर्पे यांनी आश्वासन दिले आहे.
शुंभकरोती ट्रस्टच्या वतीने कल्याण डोंबिवली व दिवा परिसरात तीन शाळा चालविल्या जातात. या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचा कारभार पाहणारे प्रमुख के. शिवा अय्यर यांनी आज शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन केडीएमसी मुख्यालय गाठले. दिल्ली राज्य सरकारने स्पोर्ट स्कूल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्पोट स्कूल सुरु करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन विद्याथ्र्यासह शाळा प्रमुख अय्यर यांनी उपायुक्त कर्पे यांना दिले आहे. एका शाळा पूर्णपणो क्रिडा आणि कला प्रकारा समर्पित असावी याकडे अय्यर यांनी लक्ष वेधले आहे. विद्यार्थी या वेळी क्रिडा साहित्य घेऊन महापालिकेत आले होते.
कल्याण डोंबिवलीचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण डोंबिवलीस स्पोर्ट सिटी करण्याचा मानस व्यक्त करुन त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले होते. अनेक आरक्षीत मोकळे भूखंड त्यांनी क्रीडा संस्थाना वापरासाठी देण्यास सुरुवात केली होती. फूटबॉल, क्रिकेट, खो खो, कबड्डी या एक एक क्रिडा प्रकारासाठी मैदाने आरक्षित करुन त्यावर त्याच प्रकारचे खेळ खेळले जातील याकडे लक्ष दिले. शाळेने स्पोर्ट स्कूलची मागणी ही स्पोर्ट सिटीच्या प्रकल्पास अनुकूल असून त्यादृष्टीने महापालिकेने पावले राज्य सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे अशी आपेक्षा अय्यर यांनी व्यक्त केली आहे.