- अनिकेत घमंडी
डोंबिवली: ज्यांनी नेहमीच भारत तोडण्याच काम केलं ते भारत जोडो यात्रा करत आहेत, असा टोला केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला आहे. अनुराग ठाकुर रविवारपासून तीन दिवस कल्याण लोकसभा दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने डोंबिवलीत त्यांच्या दौऱ्याचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.
डोंबिवलीत भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय।केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदींसह पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आले. त्यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही ठाकूर यांचं स्वागत केलं. यावेळी बोलताना अनुराग ठाकूर यांनी दौऱ्याचं स्वरूप स्पष्ट केलं.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तुम्ही जय श्रीरामचे नारे लावतोय. यासाठी पण तुम्हाला चारशे वर्षे लढाई लढावी लागली. रामलल्लाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या अयोध्येत ठिकाणी भव्य राम मंदिर बनाव हे आपण विचार करत होतो. कोर्टात पण याची लढाई लढावी लागली. मात्र, नरेंद्र मोदींचे सरकार बनलं. आणि आता पुढच्या वर्षभरात भव्य राम मंदिर तयार होईल जे आपल्या सगळ्यांचे स्वप्न आहे ते पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ठाकूर यांनी खासदार राहुल।गांधी यांच्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला लक्ष करताना आम्ही तोडफोड करून राज्य करत नाही. मात्र, ब्रिटीश गेल्यानंतर ब्रिटीशांच्या विचाराने चालणारी काँग्रेस पार्टी आहे. ती भारत जोडण्याची यात्रा करतेय. त्यांनी नेहमीच तोडण्याचं काम केलं आता, खा.राहुल गांधी प्रवासावर निघाले. तेव्हा धर्माधर्मात भांडण लावण्याचं, तेढ निर्माण करण्याचे काम ते करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्यात आलेलं सरकार हे विकासाचे काम करतेय. हा दौरा संघटनात्मक बांधणीबाबत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.