जागरुक नागरिक फाऊंडेशनचा कल्याणमधील धरणे आंदाेलन मागे घेण्यास नकार
By मुरलीधर भवार | Published: December 8, 2022 04:52 PM2022-12-08T16:52:32+5:302022-12-08T16:55:22+5:30
नागरिकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क: कल्याण-डोंबिवलीतील नागरीकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून चालढकल सुरु आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र फाऊंडेशने धरणे आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.
फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षापासून शहरातील विविध नागरी प्रश्नावर प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. फाऊंडेशने २०१८ साली बेमुदत उपोषण केले होते. भाजप आमदार रविंद् चव्हाण यांच्या मध्यस्थीपश्चात हे आंदोलन मागे घेण्यात आले. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बैठक घेतली जाईल. त्यानंतर ही बैठक घेतली गेली नाही. आत्ता पुन्हा याच मुद्यावर बेमुदत धरणो आंदोलन ५ डिसेंबरपासून सुरु करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी फाऊंडेशनला पत्र दिले.
ज्या मुद्यावर हे आंदोलन सुरु आहे. ते सगळे विषय धोरणात्मक निर्णयाशी निगडीत आहे. त्यामुळे धरणे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली आहे. मात्र धरणे आंदोलन मागे घेण्यासंदर्भात ठोस धोरणात्मक निर्णय जोर्पयत घेतला जात नाही. तोर्पयत हे आंदोलन सुरुच ठेवले जाईल. येत्या आठवडय़ात आंदोलनाची दिशा बदलली जाईल असा इशारा घाणेकर यांनी प्रशासनाला दिला आहे.