कल्याण-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानात जाहिर प्रचार सभा आहे. या सभेच्या पूर्वीच शिंदे सेनेचे कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना सभेच्या स्टेजवर स्थान नसल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. मोरे यांनी सांगितेली, आमचा सभेवर बहिष्कार आहे. आम्ही या सभेला जाणार नाही.
जिल्हा प्रमुख मोरे यांनी सांगितले की, जिल्हा प्रमुख पद धर्मवीर आनंद दिघे यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूषविले आहे. त्याच पदावर मी कार्यरत आहे. मी जिल्हा प्रमुख असताना पंतप्रधानाच्या सभेच्या स्टेजवर मला स्थान दिलेले नाही. जे पदाधिकारी मोरे यांच्या हाताखाली काम करतात. त्यांना सभेच्या स्टेवर स्थान दिले आहे.
शिंदे गटाच्या शहर प्रमुखासह, भाजपच्या शहर अध्यक्षांना स्टेजवर स्थान आहे. केवळ मलाच स्टेजवर स्थान दिलेले नाही. एक प्रकारे जिल्हाध्यक्ष पदाचा हा अवमान आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला आहे. या सभेवर आमचा बहिष्कार आहे. सभेला जाणार नाही असे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
मोरे यांचा राजीनामा पक्ष प्रमुख स्विकारणार की नाही हा खरा प्रश्न आहे. मोरे यांची नाराजी सभेपूर्वी दूर होऊन त्यांना स्टेजवर स्थान मिळते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.