कल्याण स्थानकात महिलेचा गोंधळ; एक्स्प्रेसचा डब्बा शोधण्याच्या नादात कुटुंबाची ताटातूट!
By अनिकेत घमंडी | Published: April 5, 2024 09:28 AM2024-04-05T09:28:08+5:302024-04-05T09:33:19+5:30
तीन वर्षाची मुलगी ,वडील खाली राहिली म्हणून महिलेने गाडीची चेन खेचली!
डोंबिवली : कल्याणरेल्वे स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांना देखील थांबा असल्याने या ठिकाणी कायमच वर्दळ असते. त्यातच एक्स्प्रेस पकडण्याच्या नादात अनेक घटना सुद्धा स्थानकात घडतात. असाच एक प्रकार गुरुवारी रेल्वे स्थानकात घडला. एलटीटी गोरखपूर एक्सप्रेस गाडीत इच्छित डबा पकडण्याच्या नादात एका कुटुंबाची ताटातूट झाली. भेदरलेल्या महिलेने गाडीची चेन खेचली. नंतर आरपीएफ पोलीस दाखल झाले. महिलेला खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर आपली तीन वर्षांची मुलगी गाडीत राहिली म्हणून महिला व तिच्या 55 वर्षीय आईने स्टेशनवर तब्बल अर्धा तास गोंधळ घातला.
अर्ध्या तासानंतर पोलिसांनी या महिलांना पोलीस ठाण्यात नेत आपली कारवाई सुरू केली व तिच्या तीन वर्षाच्या मुलीला आणि वडिलांना सामानासकट पुढील स्टेशन वरती उतरण्याचे फोन करून सांगितले. भिवंडीत राहणाऱ्या रुपा सिंग या आपल्या कुटुंबासह गोरखपूरला चालल्या होत्या. त्यासाठी त्या कुटूंबासह कल्याण रेल्वे स्थानकात आल्या. रुपा यांच्या सोबत त्यांची आई वडील दीड वर्षाचा मुलगा आणि एक तीन वर्षांची मुलगी असा परिवार होता. फलाट क्रमांक चार वर त्यांची गाडी आली. त्यांचे एसी 2 चे तिकीट होते. मात्र सिंग कुटुंब ज्या ठिकाणी फलाटावर उभे होते त्या ठिकाणी त्यांची बोगी आलीच नाही. इच्छित डब्यात जाण्यासाठी हे कुटुंब पळू लागले. रूपा सिंग या आपल्या मुलासह आणि आईसह डब्यात चढल्या.
रूपा यांच्या वडिलांजवळ त्यांची तीन वर्षाची मुलगी होती.त्यामुळे ते दोघे नेमके गाडीत चढले नसावेत म्हणून त्यांनी चेन खेचली. चेन खेचल्यावर गाडी थांबली. पोलीस कर्मचारी चेन कोणी खेचली याचा शोध घेऊ लागले. यावेळी रूपा यांना खाली उतरवण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सर्व हकीकत सांगितली. मात्र त्यांचे वडील आणि लहान मुलगी हे सुद्धा गाडीत चढल्याची बाब नंतर समोर आली. गाडी सुरू झाली. यावेळी रूपा यांनी पोलिसांना आपली तीन वर्ष मुलीला गाडीतून उतरावे अशी विनंती केली मात्र पोलीस कारवाईसाठी तिला नेत असल्याने रूपाने व तिच्या आईने रेल्वे स्थानकात गोंधळ घातला. मात्र, नियमानुसार आरपीएफने कारवाई साठी रूपा यांच्यावर कारवाई केल्याचे सांगण्यात आले.