कोल्हापूर : महापुरामुळे बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील रेशन दुकानातील खराब झालेल्या १२४ क्विंटल गहू, तांदूळ व ३६ किलो साखर या धान्याची बाजारभावानुसार ३.९० लाख रक्कम दुकानदार संस्थेकडून वसूल करण्यात येणार आहे. या धान्याचा पंचनामा करण्यात आला असून, ते माणसाच्या व पशुपक्ष्यांच्या खाण्यायोग्य नसल्याने मातीत पुरण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.महापुरामुळे बाजारभोगावमधील शेतकरी संघाच्या रेशन दुकानातील धान्य जेसीबीने खड्डा करून त्यात गाडण्यात येत असल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, महापुरामुळे या दुकानातील धान्य भिजल्याने ते माणसाने किंवा पशुपक्ष्यांनीसुद्धा खाण्यायोग्य राहिले नव्हते. त्याचा पन्हाळा तहसीलदार यांच्याकडून पंचनामा करण्यात आला आहे. हा अहवाल शासनाला पाठवण्यात येत असून खराब झालेल्या धान्याची बाजारभावानुसार वसुली या धान्य दुकानदार संस्थेकडून करण्यात येणार आहे.खराब झालेले धान्य असे
- गहू : ८१.५ क्विंटल
- तांदूळ : ४३ क्विंटल
- साखर : ३६ किलो
- बाजारभानुसार किंमत ३.९० लाख रुपये