कोल्हापूर - जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी येथील प्रियदर्शनी पॉलीसॅक्स कंपनीत १२३ बाल मजूर सापडले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकून अवनी संस्था, सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा महिला बालविकास, जिल्हा पोलीस दल यांनी संयुक्तपणे ही कारवाई गुरुवारी (दि.१२) रोजी दुपारी तिनच्या सुमारास केली आहे. हे सर्व बाल मजूर पश्चिम बंगाल, मिझोराम, काही बांगलादेशी आहेत.
शिरोली एमआयडीसी मधील काही कंपनीत बाल मजूर काम करतात अशी माहिती अवनी या संस्थेला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी दुपारच्या सुमारास पथक प्रियदर्शनी पॉलीसॅक्स कंपनीत दाखल झाले. याठिकाणी अठरा वर्षांच्या आतील १२३ बाल मजूर काम करताना आढळून आले. या कारवाईत सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, सरकारी कामगार अधिकारी यशवंत हुंबे, फॅक्टरी इंन्सपेक्टर ए.बी. खरडमल, जिल्हा महिला बालविकास संरक्षण कक्ष अधिकारी अभिमन्यू पुजारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक शिंदे, पोलीस नाईक ए.आर.पटेल यांच्यासह १६ पोलीस कर्मचारी व अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होते.