Kolhapur: एसटीत चढताना वृद्धेचे १४ तोळे दागिने चोरट्याने लांबविले, मध्यवर्ती बस स्थानकातील प्रकार
By उद्धव गोडसे | Published: April 28, 2024 01:29 PM2024-04-28T13:29:00+5:302024-04-28T13:29:25+5:30
Kolhapur: गर्दीत अंगावरील दागिन्यांची चोरी होऊ नये, यासाठी वृद्धेने दागिने काढून पिशवीत ठेवलेली पर्स चोरट्याने हातोहात लंपास केली. पर्समध्ये १४ तोळे दागिने आणि २०० रुपयांची रोकड होती. हा प्रकार शनिवारी (दि. २७) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील फलाट क्रमांक आठवर गडहिंग्लजला जाणा-या बसमध्ये चढताना घडला.
- उद्धव गोडसे
कोल्हापूर - गर्दीत अंगावरील दागिन्यांची चोरी होऊ नये, यासाठी वृद्धेने दागिने काढून पिशवीत ठेवलेली पर्स चोरट्याने हातोहात लंपास केली. पर्समध्ये १४ तोळे दागिने आणि २०० रुपयांची रोकड होती. हा प्रकार शनिवारी (दि. २७) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील फलाट क्रमांक आठवर गडहिंग्लजला जाणा-या बसमध्ये चढताना घडला. याबाबत सुशीला विष्णू चौगुले (वय ६१, रा. उंबरवाडी, पो. महागाव, ता. गडहिंग्लज) या महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुशीला चौगुले या गावी जाण्यासाठी गडहिंग्लजला जाणा-या एसटीची वाट पाहत होत्या. गर्दीत अंगावरील दागिन्यांची चोरी होऊ नये, यासाठी त्यांनी सोन्याची चेन, दोन हार, ब्रेसलेट, गंठण असे सुमारे १४ तोळ्यांचे दागिने छोट्या पर्समध्ये ठेवले. ती पर्स पिशवीत ठेवली. काखेत पिशवी अडकवून त्या गर्दीतून बसमध्ये चढत होत्या. त्याचवेळी चोरट्याने हातचालाखीने पिशवीतील दागिन्यांची पर्स गायब केली. एसटीत बसल्यानंतर त्यांना दागिने चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी एसटीत आणि फलाटावर दागिन्यांचा शोध घेतला. त्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रोज चोरीच्या घटना असतानाही चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.