म्हाकवे : लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होऊ नये याची दक्षता घेत त्यांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. कठीण परिस्थितीत अर्थसाहाय्य करून कामगारांना दिलासा दिला. याबाबत कामगारांच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. भरमा कांबळे व जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम यांनी समाधान व्यक्त केले. याचा राज्यातील सुमारे १० लाख, तर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ६५ हजार नोंदीत कामगारांना लाभ होणार आहे. यासाठी सुमारे १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
१२ एप्रिल रोजी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई, सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे, यशवंत हुंबे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सिटूचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत कामगारांना कशी मदत करता येईल याबाबत चर्चा झाली होती.
मंत्री मुश्रीफ यांनी कामगारांच्या अडचणी जाणून घेऊन कामगारांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
या बैठकीस सिटूचे कॉ. भरमा कांबळे, कॉ चंद्रकांत यादव, कॉ. शिवाजी मगदूम उपस्थित होते. खात्यावर जमा रकमेचे मॅसेज आल्याने कामगारांमधून समाधान व्यक्त होत असल्याचेही लाल बावटा संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.