कोल्हापूर : टिंबर मार्केटमधील गंजीमाळ येथे घरावर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पाचजणांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, मंगळवार (दि. २०)पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पूर्ववैमनस्यातून शनिवारी (दि. १०) रोजी गंजीमाळ परिसरात दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यात एका पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याच वादाचे पडसाद पुन्हा सोमवारी (दि. १२) उमटले होते. त्यातून वीस ते पंचवीस जणांच्या गटाने गंजीमाळ परिसरातील ओंकार जाधव यांच्या घराची व परिसरातील वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी गुरुवारी (दि. १५) जुना राजवाडा पोलिसांनी साहील अस्लम हकिम , सौरभ उर्फ स्वरुप चौगले, महेश राजू पाथरकर, शंकर सुभाष लोंढे, राजेश कांबळे या पाच संशयितांना अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून हल्ल्यात वापरण्यात आलेल्या दोन तलवारी व गज आदी शस्त्रे जप्त केली.