कोल्हापूर : येथील नामांकित ॲटोमोबाईल्स कंपनीचा सदस्य असल्याचे भासवून तिघा अज्ञातांनी बनावट ई-मेलद्वारे एका राष्ट्रीयीकृत बँकेतून २९ लाख ३४ हजाराची रक्कम आपल्या खात्यावर जमा करण्यास भाग पाडत, फसवणूक केली. याबाबत चंद्रकांत बसाप्पा गुडस्कर (वय ५९, रा. शुभम सिग्नेचर अपार्टमेंट, हॉकी स्टेडियमजवळ) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रिंकू कुमार, नेसर आलम व अन्य एक अशा तिघांवर पोलिसांत गुन्हा नोंद झाला.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तिघा अज्ञातांनी २७ जानेवारीस सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास या नामांकित ॲटोमोबाईल कंपनीचा सदस्य असल्याचे भासवत, बनावट ई-मेलवरून लबाडीच्या इराद्याने खात्यातून २९ लाख ३४ हजार रुपये परस्पर आपल्या खात्यात भरण्यास एका राष्ट्रीयीकृत बँकेस भाग पाडून, फसवणूक केली. याप्रकरणी बँकेतर्फे गुडस्कर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार मिळालेल्या मोबाईल सीमकार्ड क्रमांकावरून पोलिसांनी लाभार्थी रिंकू कुमार, नेसर आलम व अन्य एकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या फसवणुकीचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड करीत आहेत. याबाबत बँकेशी संपर्क साधला असता, या ॲटोमोबाईल्स कंपनीच्या नावे अज्ञातांनी बनावट कागदपत्रे सादर करून आरटीजीएसद्वारे पैसे घेऊन बँकेची फसवणूक केली आहे.
बँकेमध्ये जरूरी असलेली कागदपत्रे बनावटरित्या सादर करून व खरे असल्याचे भासवून पैसे हडप करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले आहे. असे सांगण्यात आले.