- संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोरोना साथीच्या फटक्यातून मराठी चित्रपट उद्योगही सुटलेला नाही. मराठी चित्रपट उद्योगाचे जवळपास ४०० कोटींचे नुकसान झाले आहे. चित्रीकरण, प्रदर्शन रखडल्याने काही मोजके कलाकार सोडले तर अनेकांना पैशाची चणचण जाणवत आहे. कलाकार व तंत्रज्ञांचीही उपासमार होत आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला ‘बिगिन अगेन’चे वेध लागले आहे.मराठीत वर्षाला १५० चित्रपट तयार होतात. त्यातीलही फक्त आठ ते दहाच सुपरहिट होतात तर ९० ते १४० चित्रपट तोट्यात जातात. ‘झी सिनेमा’चा ‘पांडुरंग’, प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’, दिग्पाल लांजेकरचा ‘जंग जौहर’ या चित्रपटांसह २५ ते ३० छोट्या चित्रपटांचे चित्रीकरण कसेबसे सुरू आहे. प्रकाश वैद्य यांच्या ‘छू मंतर’ चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ‘एबी आणि सीडी’, ‘विजेता’, ‘इभ्रत’ हे तीन प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी चित्रपटगृहे बंद झाली. महेश मांजरेकर यांचा ‘पांघरूण’, ‘वायकॉम-१८’चा ‘मी वसंतराव देशपांडे’, ‘दे धक्का-२’, ‘मीडियम स्पायसी’, ‘बस्ता’, ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटालॉजी’, ‘दगडी चाळ-२’, ‘अजिंक्य’, ‘ईमेल-फीमेल’, ‘येरे येरे पावसा’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘नेबरहुड’, ‘झॉलीवूड’, ‘वाजवूया बँडबाजा’ हे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत.
- चित्रपटगृहे सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून हाेत आहे.
चित्रपट महामंडळाने सहकार्य करून सरकारकडून काही रक्कम या वर्गाला मिळवून द्यावी.- नीतिन दातार, अध्यक्ष, सिनेमा ओनर्स असोसिएशन
हिंदीप्रमाणे मराठीत काॅर्पोरेट कंपन्या नसल्यामुळे मराठी चित्रपटांचे भवितव्य अंधारात आहे.- समीर दीक्षित, चित्रपट उद्योग अभ्यासक