लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर- जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात १९ जणांची बदली करण्यात आली असून त्यांना बुधवारी विभाग वाटून देण्यात येणार आहेत. आपल्याला हवा तो विभाग मिळवण्यासाठी इच्छुकांनी सर्व यंत्रणा सक्रिय केली आहे. दरम्यान मंगळवारी ४२ प्राथमिक शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली.
गेल्या पंधरा दिवसात दोन टप्प्यात जिल्हा परिषदेतील २०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यातील १९ जणांना मुख्यालयात नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे यातील अनेकजण दिवसभर जिल्हा परिषदेत उपस्थित होते. त्यांनी संध्याकाळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांची भेट घेतली. देसाई यांनी बुधवारी विभागातील नियुक्त्या केल्या जातील असे सर्वांना सांगितले.
दरम्यान कोणाला कोणता विभाग द्यायचा याचा निर्णय आता अध्यक्ष राहुल पाटील यांनी आपल्याकडे घेतला आहे. त्यामुळे अनेकांनी पसंतीच्या विभागासाठी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
गणित आणि विज्ञान विषयासाठी शिक्षकांना पदोन्नती देण्याचा विषय गेले काही महिने चर्चेत होता. सध्या हे विषय शिकवण्यासाटी पात्र असलेले ११०० शिक्षक आहेत. मात्र सुमारे ८०० जागा उपलब्ध आहेत. अशातच बारावी शास्त्र विषय उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाही विषय शिक्षक म्हणून पदोन्नती देण्याचा मुद्दा पुढे आला होता. परंतु पहिल्या टप्प्यात पदवीधरांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
चौकट
पाच जणांचा नकार
जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात दुपारनंतर समुपदेशन पद्धतीने ही पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली. शिक्षण सभापती रसिका पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया झाली. यावेळी पात्र ४८ पैकी एक शिक्षक गैरहजर राहिले तर पाच जणांनी पदोन्नती नाकारली. त्यामुळे ४२ जणांना पदोन्नती देण्यात आली.