गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात ४३८ रुग्णांना मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:22 AM2021-05-22T04:22:59+5:302021-05-22T04:22:59+5:30
* कोरोनाची लढाई : शासकीय कोविड काळजी केंद्रात ४३५ रुग्ण झाले बरे राम मगदूम । गडहिंग्लज दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या ...
* कोरोनाची लढाई : शासकीय कोविड काळजी केंद्रात ४३५ रुग्ण झाले बरे
राम मगदूम । गडहिंग्लज
दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या महामारीत येथील उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय कोविड काळजी केंद्रच गोरगरीब रुग्णांना वरदान ठरले आहे. आजअखेर उपजिल्हा रुग्णालयातून ४३८ रुग्णांना जीवनदान मिळाले असून, शासकीय कोविड काळजी केंद्रात ४३५ रुग्ण बरे झाले आहेत. म्हणूनच, कोरोनाच्या लढाईत येथील सरकारी आरोग्य यंत्रणाच भारी ठरली आहे. दोन्ही ठिकाणी मिळून आजअखेर ८७३ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे.
पहिल्या लाटेवेळीच रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, व्हेंटिलेटर, हायफ्लो मशीन, ट्रान्सपोर्टेबल व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचे १८० जम्बो सिलिंडर व ४ ड्युरा सिलिंडर, डायलेसीस व आयसीयू युनिट, ऑपरेशन थिएटरचे वातानुकूलीकरण झाले आहे. या अत्याधुनिक साधनसामग्रीचा उपचारासाठी मोठा फायदा होत आहे.
गेल्यावर्षीच्या पहिल्या लाटेतच गडहिंग्लज विभागातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाने १०० खाटांचे हे रुग्णालय कोविडसाठी समर्पित केले. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही गेल्या तीन महिन्यांपासून याठिकाणी केवळ कोविड रुग्णांवरच उपचार सुरू आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर शेंद्री माळावरील कोविड काळजी केंद्रात उपचार केले जात आहेत. ऑक्सिजनपातळी ५० ते ६० पर्यंत खाली आल्यानंतर उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांचे प्राण वाचविणे आव्हानात्मक ठरत आहे. व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्यामुळे काही रुग्णांना 'सीपीआर'कडे पाठवावे लागत आहे.
----------------------------------------
* सेवाभावी डॉक्टर आणि ऑक्सिजन प्रकल्प..! वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे, प्रभारी डॉ. चंद्रकांत खोत आणि त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांचा सेवाभाव आणि रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पामुळेच रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होत आहे.
----------------------------------------
* मंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष लक्ष
कोरोनाच्या महामारीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे गडहिंग्लजच्या शासकीय आरोग्य यंत्रणेकडे विशेष लक्ष आहे. महिन्यातून दोनवेळा स्वत: गडहिंग्लजला येऊन ते कोरोना परिस्थितीचा आढावा घेतात. ऑक्सिजन प्रकल्पाच्या विस्तारिकरणासह रुग्णालयात अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच आरोग्य विभागासह संबंधित सर्व खात्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऊर्जा मिळाली आहे.
----------------------------------------
* गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची आकडेवारी (२१ मे अखेर)
- दाखल रुग्ण : ७७६ - बरे झालेले : ४३८ - उपचार घेत असलेले : १२८ - मृत्यू : ९६ ----------------------------------------
* शेंद्री माळ कोविड केंद्राची आकडेवारी (२१ मे अखेर)
- दाखल रुग्ण : ५५९ - बरे झालेले : ४३५ - उपचार घेत असलेले : १२४ - मृत्यू : ९६ ----------------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अत्याधुनिक मशीनरीद्वारे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. दुसऱ्या छायाचित्रात शेंद्री माळावरील घरच्या सदस्याप्रमाणे रुग्णांची काळजी घेणाऱ्या शासकीय कोविड केंद्रात कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाने पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
क्रमांक : २१०५२०२१-गड-१०/११