रंकाळा संवर्धनासाठी ५० लाखांचा निधी,पालकमंत्री पाटील यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 10:57 AM2020-12-26T10:57:19+5:302020-12-26T10:58:53+5:30
tourism kolhapur News- ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५० लाखांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पदपथ उद्यानात झालेल्या कार्यक्रमात केली. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या रंकाळा विकास आराखड्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कोल्हापूर : ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५० लाखांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पदपथ उद्यानात झालेल्या कार्यक्रमात केली. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या रंकाळा विकास आराखड्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे आयोजित केलेल्या रंकाळा दिवस समारंभ तसेच पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या रंकाळा -रंकतीर्थ, शौर्यतीर्थ, पक्षितीर्थ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
रंकाळा तलावाचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न राजेंद्र पाटील यांनी पुस्तकातून केला असल्याने नव्या पिढीला तलावाचे संदर्भ मिळतील असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, रंकाळा, राजाराम, कोटितीर्थ, कळंबा तलाव कोल्हापूरचे वैभव आहे. कळंबा तलावाचे संवर्धन तसेच सुशोभीकरणाच्या कामाला दि. ३१ मार्चपर्यंत गती मिळेल. ५० लाखांच्या निधीतून रंकाळा तलावाचेही विद्युतीकरण, लॉन, डस्टबिन, बुरुज दुरुस्ती यासारखी कामे हाती घेतली जातील, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. वसंतराव मोरे यांनी रंकाळा या शौर्यतीर्थाचे स्मारक व्हावे आणि त्यामध्ये राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. जर शासन कमी पडत असेल तर आम्ही कोल्हापूरकर मागे हटणार नाही, असेही ते म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रंकाळा तलाव जसा पर्यटकांना भुरळ घालणार आहे तसाच त्याचा इतिहासदेखील रंजक आहे. तो आज पुस्तकरूपाने समोर आला, असे म्हणाले.
प्रारंभी राजेंद्र पाटील यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते चंद्रकांत वडगावकर यांनी आणलेला केक कापून रंकाळा तलावाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. संध्याकाळी शब्दसुरांच्या झुल्यावर हा संगीत मैफिलीचा कार्यक्रम झाला.