कोल्हापूर : गेली १२ वर्षे शेणीदान उपक्रम राबविणाऱ्या शिवाजी पेठ, वांगी बोळ येथील अचानक तरुण मंडळातर्फे यावर्षीही ५१ हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीला दान देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष ओंकार वेढे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी (दि. ५) सकाळी साडेअकरा वाजता वांगी बोळ येथे भागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे वेढे यांनी सांगितले.आेंकार वेढे म्हणाले, पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून कोल्हापुरात प्रथम मंडळाने होळी दान या उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. प्रदूषण होऊ नये यासाठी हा उपक्रम राबवित आहोत. कार्यकर्ते व सदस्यांनी एकत्र येऊन आपापसात वर्गणी एकत्र करून हा उपक्रम केला आहे. बालिंगे, गिरगांव, राक्षी, आंबेवाडी व इतर गावांतून दोन महिने अगोदर शेणी गोळा केल्या जातात. आमचा हिंदूच्या या सणाला विरोध नाही. प्रत्येकाने होळीची पूजा करावी. या उपक्रमाला तालीम, तरुण मंडळाने सहकार्य करावे.पत्रकार परिषदेस महादेव मोरे, राजू वेढे, राजू जाधव, सतीश पाटील, शशिकांत सोनाळीकर, विलास निकम, महेश पोरे, विवेक वेढे, विवेक पाटील, रवी पोतदार, विजय घोटाळे, योगेश मिणचेकर, संदीप पोवार, परेश वेढे उपस्थित होते.
होळीनिमित्त ५१ हजार शेणी दान करणार
By admin | Published: March 02, 2015 12:10 AM