लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ५५५ शाळांमधील स्वच्छतागृहे नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. गेले काही महिने जरी शाळा बंद असल्या तरीदेखील आता शाळा सुरू झाल्यानंतर या सर्वांना वेगळ्या अडचणींना पुन्हा सामोरे जावे लागणार आहे. या दुरुस्तीसाठी गेली तीन वर्षे निधीची मागणी करूनही तो मिळत नसल्याचे सांगण्यात आले. या सर्व स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी साडेपाच कोटी रुपयांची गरज आहे.
निर्मलग्राम योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यासाठी तातडीने पाणीपुरवठा करावा असे आदेशही ग्रामपंचायतींना देण्यात आले. अनेक शाळांमध्ये अशी स्वच्छतागृहे बांधण्यात आली. शासकीय आदेशाप्रमाणे एकही शाळा स्वच्छतागृहाशिवाय वंचित राहू नये, असे नियोजन करण्यात आले.
परंतु नेहमीप्रमाणे देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत गेल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची २९० आणि विद्यार्थिनींची २६५, अशी ५५५ स्वच्छतागृहे नादुरुस्त असल्यामुळे वापरात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या काळामध्ये प्राथमिक शाळा बंद होत्या; परंतु बाहेरगावाहून आलेल्यांना शाळांमध्ये ठेवण्यात आल्याने त्यांचीही या बंद स्वच्छतागृहांमध्ये अडचण झाली. आता पुन्हा शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्यामुळे या ५५५ स्वच्छतागृहांअभावी मुला-मुलींना या अडचणींचा पुन्हा सामना करावा लागणार आहे.
चौकट
तालुकावर बंद असलेली स्वच्छतागृहे
तालुका मुलांची बंद असलेली स्वच्छतागृहे मुलांची बंद असलेली स्वच्छतागृहे
आजरा १५ १५
भुदरगड १४ १७
चंदगड १२ १६
गगनबावडा ०८ ०९
गडहिंग्लज १९ १३
हातकणंगले ३५ ३१
कागल २१ १५
करवीर ३१ ३३
पन्हाळा २७ ३६
राधानगरी २० १५
शाहूवाडी ४७ ३२
शिरोळ ४१ ३३
एकूण २९० २६५
कोट
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांच्या संरक्षक भिंतींसाठी १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे या स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी करणार आहे.
बजरंग पाटील
अध्यक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूर