सरपंचपदासाठी ५५७ उमेदवारांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:08 AM2017-09-27T01:08:06+5:302017-09-27T01:08:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्णातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मंगळवारी सरपंचदासाठी २८५ तर सदस्यपदासाठी १२३५ अर्ज दाखल करण्यात आले. आजअखेर सरपंचपदासाठी ५५७ उमेदवारांकडून सुमारे ५६७ तर सदस्यपदासाठी २८१५ उमेदवारांनी २८५२ अर्ज दाखल केले. ४७२ ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक होत असून मंगळवारीही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक केंद्रांमध्ये उमेदवार, समर्थकांची गर्दी होती.
शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. तर दि. १६ आॅक्टोबरला मतदान आहे. अद्याप पक्षीय पातळीवर नेत्यांनी आपले पत्ते खुले न केल्याने स्थानिक आघाड्या तयार होण्याची शक्यता आहे.
गडहिंग्लज तालुक्यात
सदस्यसाठी ६६ अर्ज दाखल
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात सात गावांच्या सरपंचपदासाठी सात, तर १५ गावांच्या सदस्यपदासाठी आज एकूण ६६ अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारअखेर सरपंचपदासाठी एकूण ३१, तर सदस्यपदासाठी एकूण १९६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. एकूण ८९ पैकी ३५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.
करवीर तालुक्यात
सरपंचपदासाठी २२ अर्ज
कसबा बावडा : करवीर तालुक्यामधील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकींसाठी मंगळवारी सरपंचपदासाठी २२, तर सदस्यपदासाठी १८६ असे एकूण २०८ अर्ज दाखल झाले आहेत.
शाहूवाडीतून सरपंचपदासाठी
२० अर्ज दाखल
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी सरपंचपदासाठी २०, तर सदस्यपदासाठी ९० अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत सरपंचपदासाठी ४८, तर सदस्यपदासाठी १९८ अर्ज दाखल झाले आहेत.
शिरोळमध्ये सरपंचपदासाठी १७,
तर सदस्यांचे ७९ अर्ज दाखल
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी सरपंचपदासाठी १७, तर सदस्यपदासाठी ७९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सरपंचपदासाठी शिवनाकवाडी १, हेरवाड ३ व खिद्रापूर २ असे एकूण ६ अर्ज दाखल झाले. तर सदस्यपदासाठी शिवनाकवाडी ५, राजापूरवाडी १, अकिवाट १, कवठेसार २, खिद्रापूर ४, हेरवाड ८, कनवाड ११, राजापूर ४ असे एकूण ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
कागलमधून सरपंचपदासाठी
२६ अर्ज दाखल
कागल : कागल तालुक्यातील २६ ग्रामंपचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारीही सरपंचपदासाठी २६, तर सदस्यपदासाठी ११९ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत सरपंचपदासाठी ४३, तर सदस्यपदासाठी एकूण १८५ अर्ज दाखल झाले.
गगनबावडा सरपंचपदासाठी
पाच अर्ज दाखल
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी सरपंचपदासाठी पाच, तर सदस्यपदासाठी २६ असे एकूण ३२ अर्ज दाखल झाले. २१ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचासह १५९ सदस्य निवडले जाणार आहेत.
आजºयात सरपंचपदासाठी ११, तर सदस्यपदासाठी ५३ अर्ज दाखल
आजरा : आजरा तालुक्यातील एकूण ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. पाचव्या दिवशी, मंगळवारी सरपंचपदासाठी ११ उमेदवारांनी, तर सदस्यपदासाठी ५२ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले. मंगळवारी दिवसभरात ६४ अर्ज दाखल झाले. आजपर्यंत सरपंचदासाठी ४३, तर सदस्यपदासाठी १४२ अर्ज दाखल झाले आहेत.
पन्हाळ्यात सरपंचपदासाठी
२६ अर्ज दाखल
पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील १७ गावातून सरपंचपदासाठी २३ उमेदवारांनी २६ अर्ज तर सदस्यपदासाठी २० गावांतून १३९ जणांनी १४९ अर्ज दाखल केले. आजपर्यंत सरपंचपदासाठी ८८, तर सदस्यपदासाठी ४५१ अर्ज आले आहेत.
हातकणंगलेत सरपंचपदासाठी
१५ अर्ज दाखल
हातकणंगले : हातकणंगले तालुक्यात पाचव्या दिवशी सरपंचपदासाठी १५ तर सदस्यपदासाठी १४४ अर्ज दाखल झाले आहेत. आजअखेर तालुक्यातून सरपंचपदासाठी ६९ तर सदस्यांसाठी ५१३ अर्ज दाखल झाले आहेत.
राधानगरीत सरपंचपदासाठी
२९ अर्ज दाखल
राधानगरी : राधानगरी तालुक्यात मंगळवारी सरपंचपदासाठी २९, तर सदस्यपदासाठी १३१ अर्ज दाखल झाले. अर्जांसोबत जोडायच्या कागदपत्रांबाबतही मतमतांतरे असल्यामुळेही इच्छुकांचा गोंधळ उडत आहे.
भुदरगडमध्ये सरपंचपदासाठी
९५ अर्ज दाखल
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी सरपंचपदाचे ९५, तर सदस्यपदासाठी १६१ अर्ज दाखल झाले. मुदाळमधून विक्रमी ३८ अर्ज दाखल झाले आहेत. आजपर्यंत सरपंचपदाचे १२८, सदस्यपदाचे २४0 अर्ज दाखल झाले.
सर्व्हर डाऊनचा त्रास, यंत्रणाही सुस्त
कागलमध्ये आॅनलाईन माहिती भरण्याच्या प्रकियेचा त्रास इच्छुकांना होत असून, वारंवार सर्व्हर डाऊनसारखे प्रकार होत असल्याने दिवस दिवस थांबूनही अर्ज भरण्याची प्रकिया पूर्ण होत नाहीत. तसेच शासकीय यंत्रणाही सुस्त दिसत आहे. परिणामी, अर्ज भरण्यात म्हणावा तसा वेग दिसत नाही. गगनबावड्यातही आॅनलाईन अर्ज भरतांना सर्व्हर डाऊनचा फटका बसत असल्याने उमेदवार रात्रीचे जेवण उरकून महा-ई सेवा केंद्रावर अर्ज भरायला येत आहेत. यामुळे याठिकाणी रात्रीची गर्दी दिसून येत आहे.
हातकणंगले, करवीरमधून सर्वाधिक
सरपंचपदासाठी पन्हाळा तालुक्यातून सर्वाधिक ८१ उमेदवारांनी ८७ अर्ज दाखल केले. राधानगरी तालुक्यातून ७६ उमेदवारांनी प्रत्येकी १ अर्ज दाखल केले आहेत. सदस्यपदासाठी हातकणंगले तालुक्यातून सर्वाधिक ५१३ उमेदवारांनी ५१५ अर्ज दाखल केले आहेत. त्यापाठोपाठ करवीर तालुक्यातून ५०१ उमेदवारांनी प्रत्येकी १ अर्ज दाखल केला आहे.