कोल्हापूर : नवस्नातकांनी पदवी, पदविका, प्रमाणपत्रे घेऊन नव्या युगात प्रवेश करीत असताना आपली वाणी आणि कृतीच्या संदर्भाने आपली पात्रता सिद्ध करावी, असे आवाहन तिरूचिरापल्ली येथील भारतीय प्रबंध संस्थानचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी शुक्रवारी येथे केले.
राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, महाविद्यालयाच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून आता तुम्ही प्रत्यक्ष जगात कार्यरत होणार आहात. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या जगात आपले भविष्य वेगळे असणार असून आपल्या भूमिका निश्चिपणे बदलणार आहेत. त्यामुळे निरंतर अध्ययन, बदलते तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करून कृतीशीलतेच्या जोरावर स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करा. शिवाजी विद्यापीठाच्या ५५ व्या दीक्षान्त समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. विद्यासागर राव होते. त्यांच्या हस्ते अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील सत्यजित पाटील याला सन २०१८-१९ मधील विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. शिरोली पुलाची (ता. करवीर) येथील साक्षी गावडे हिला एम. ए. सामाजिकशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल ‘कुलपती पदका’ने सन्मानित केले.
नवीन विद्यापीठ कायद्यातील परिनियमानुसार यंदा या समारंभाच्या स्वरूपात बदल झाला. विद्यापीठातील अधिविभागांमधील पदवीधारकांनाच केवळ या समारंभात पदवी प्रदान करण्यात आल्याने स्नातकांची गर्दी कमी होती. उपस्थित स्नातकांमध्ये उत्साह दिसला, तरी समारंभातील बदल ठळकपणे जाणवत होता.डॉ. भीमराया मेत्री म्हणाले, डिजिटल युगातील विद्यार्थी हे ज्ञानयुगाचे वारकरी आहेत. जगातील सर्वाधिक तरूण महासत्ता असलेल्या आपल्या देशातील प्रत्येक युवकाला जागतिक संधीची दारे खुली आहेत. आपल्याला आज माहित नसलेल्या संधी भविष्यात उपलब्ध होणार आहेत. या संधी साधण्यासाठी उच्च प्रतीची कौशल्ये, ज्ञान, स्पर्धात्मकता, कृतीशीलता हे शब्द ध्यानात ठेऊन कार्यरत रहावे.या कार्यक्रमाच्या प्रारंभी परीक्षा नियंत्रक महेश काकडे हे दीक्षान्त मिरवणुकीने ज्ञानदंड घेऊन कार्यक्रमस्थळी आले. यावेळी शाहू छत्रपती, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. आलोक जत्राटकर, धैर्यशील यादव, जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.