रायगडसाठी ६०६ कोटींचा आराखडा मंजूर -संभाजीराजे यांची माहिती : शिवकालीन ढाचा कायम ठेवून संवर्धन; पंधरा दिवसांत काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:03 AM2018-01-09T01:03:29+5:302018-01-09T01:03:56+5:30
कोल्हापूर : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड प्राधिकरणांतर्गत केंद्र सरकारकडून ६०६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे त्यातील ८० कोटींचा निधी मिळाला असल्याची माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी
कोल्हापूर : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड प्राधिकरणांतर्गत केंद्र सरकारकडून ६०६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे त्यातील ८० कोटींचा निधी मिळाला असल्याची माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत दिली. दुर्गराज रायगड किल्ल्याचा शिवकालीन ढाचा कायम ठेवून मंजूूर निधीतून संवर्धन केले जाणार आहे. येत्या पंधरा दिवसांत या संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या रायगड किल्ल्याबाबतची माहिती अथवा जुने दस्ताऐवज ज्या इतिहासप्रेमींकडे असतील त्यांनी ते प्राधिकरणाकडे द्यावेत. त्याचा आधार घेऊन किल्ला विश्ववंदनीय केला जाईल, असेही संभाजीराजे यांनी यावेळी स्पष्ट केले. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागासह इतर विभागांच्या परवानग्यांच्या तांत्रिक बाबी येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार संभाजीराजे म्हणाले, राज्यातील ३५० किल्ल्यांमधील रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी असल्याने या किल्ल्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. रायगड संवर्धन आराखड्यात या किल्ल्यासह परिसरातील २२ गावांचा विकास केला जाणार आहे. चित्र दरवाजा ते महादरवाजा, महादरवाजा ते होळीच्या मैदानापर्यंतच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. इतिहास तज्ज्ञांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ला बनवायचा आहे, हे काम फार मोठे असून ते पूर्ण होण्यासाठी किमान १० वर्षांचा कालावधी लागणार असल्याची अपेक्षा संभाजीराजे यांनी व्यक्त केली.
संवर्धनातील महत्त्वाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तर अतिमहत्त्वाचे काम पुरातत्त्व विभागाकडून केले जाणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. रायगड किल्ल्यावरील पाण्याच्या १३ टाक्यांपैकी पहिल्या टप्प्यात ४ टाक्या दुरूस्त केल्या जाणार आहेत. संवर्धनाच्या कामात राज्यातील शिवभक्तांनी सहभागी होऊन आवश्यक त्या सूचना मांडाव्यात,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवकालीन ऐतिहासिक वस्तू व पुरावे शोधण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने किल्ल्यामध्ये उत्खनन करणे आवश्यक आहे; पण उत्खननापूर्वीच काही लोकांना ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत, त्यांनी शिवकालीन वारसा जपण्यासाठी अशा वस्तू प्राधिकरणाकडे म्युझियममध्ये जमा कराव्यात, असे आवाहन संभाजीराजे यांनी यावेळी केले. मंजूर झालेल्या ६०६ कोटी रुपये निधीपैकी ८० कोटी निधी प्रधिकरणाकडे जमा झाला आहे.
रायगड प्राधिकरणात पन्हाळगडाचाही समावेश
राज्यातील सर्वच किल्ल्यांचे संवर्धन टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा असे पाच ते सहा किल्ले या रायगड प्राधिकरणामध्ये समाविष्ट करून त्यांचे संवर्धन केले जाणार आहे. त्यानंतरच इतर किल्ल्यांच्या संवर्धनाकडे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
‘राजसदर’चे पावित्र्य अबाधित
राजसदराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भरत असलेल्या ठिकाणचे पावित्र्य राखण्यासाठी तेथे शिवराज्याभिषेकाशिवाय दुसरा कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही. याबाबत अधिकाºयांशी चर्चा सुरू आहे. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजीराव भिडे यांनी रायगडवर ३२ मण सोन्याचे राजसिंहासन बसविण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी सोन्याचे संकलन सुरू आहे. हे सिंहासन बसविण्यासाठी रायगड व प्राधिकरण परवानगी देणार काय? या विषयाबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. रायगड किल्ल्यासाठी काहीही करताना पुरातत्त्व विभाग आणि प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही संभाजीराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
संवर्धन काम प्रारंभासाठी २ परवाने हाती, ६ बाकी
दहा दिवसांत परवानगी प्रक्रिया होणार पूर्ण
प्राधिकरणात किल्ल्यासह परिसरातील २२ गावांचा विकास
प्राधिकरणावर जयसिंगराव पवार, भगवान चिले
कोकणचे विभागीय आयुक्त व रायगडचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी अधिकाºयांचा या रायगड प्राधिकरणामध्ये समावेश करण्यात आला आहे. या प्राधिकरणावर तज्ज्ञ संचालक म्हणून डॉ. जयसिंगराव पवार, राम यादव, भगवान चिले, राघोजी आंग्रे आदी इतिहास अभ्यासकांचा समावेश आहे.